मूर्तिजापूर तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट; शेकडो एकरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 05:43 PM2021-12-28T17:43:07+5:302021-12-28T17:43:37+5:30
Hailstorm : अचानक आलेल्या गारपीटीसह अवकाळी पावसाने शेकडो एकरवरी पिकांचे नुकसान झाले आहे.
म र्तिजापूर : तालुक्यात अचानक आलेल्या गारपीटीसह अवकाळी पावसाने शेकडो एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात तुर हरभरा, गहू, कांदा भाजीपाला व फळबागांचा समावेश आहे. मंगळवार दि. २८ डिसेंबर रोजी दुपारी २:३० वाजताच्या दरम्यान झालेल्या गारपीटीसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली धोधो पावसासह गारपीट झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील निंभा, कमळणी कमळखेड, धोत्रा शिंदे, धानोरा पाटेकर, अनभोरा, शेंद, बिडगाव, शिवण खुर्द, राजूरा घाटे, मोहखेड, मुरंबा, उमरी अरब या गावांसह परीसरातील गावांना अवकाळी पावसाने झोडपले दरम्यान बोराच्या आकाराची गार पडली, या गावांत व परीसरात किमान एक तासाच्या वर गारपीट झाल्याने गावात गारांचा खच साचलेला होता. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच बरोबर निंभा येथील गुरांच्या गोठ्यावर तीन ठिकाणी झाडे कोसळल्याने गोठा कोसळून अनेक जनावरे जखमी झालीत, झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.