लसीचा साठा नसल्याने निम्मी केंद्र बंद; १ मेपासून काय होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:19 AM2021-04-27T04:19:25+5:302021-04-27T04:19:25+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना लसीकरणाचा मोठा आधार आहे. मागील चार महिन्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, ६० वर्षांवरील ज्येष्ठ ...
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना लसीकरणाचा मोठा आधार आहे. मागील चार महिन्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. लसीकरणाला लाभार्थींचा प्रतिसादही मिळत आहे. परंतु, गरजेनुसार लस उपलब्ध होत नसल्याने अनेक केंद्र बंद पडत आहेत. जिल्ह्यात १ एप्रिलपासून १५३ केंद्रांवर कोविड लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. आठवडाभर यशस्वी चाललेल्या लसीकरणानंतर लसीचा तुटवडा भासल्याने लसीकरण केंद्र बंद पडण्यास सुरुवात झाली. कधी कोविशिल्ड, तर कधी कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध नसल्याने केवळ एकच लस लाभार्थींना दिली जात आहे. त्यामुळे लसीच्या दुसऱ्या डोसच्या लाभार्थींना लस न घेताच परतावे लागत आहे. मागील तीन दिवसांपासून लस नसल्याने महापालिका क्षेत्रात लसीकरण मोहीम ठप्प पडली होती, अशा परिस्थितीत १ मेपासून या मोहिमेचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा
१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोविड लस देण्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले. ही मोहीम कशा पद्धतीने राबविण्यात येणार आहे, याविषयी जिल्हा आरोग्य विभागाला शासनामार्फत आवश्यक मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नाहीत.
जोपर्यंत मार्गदर्शक सूचना मिळत नाहीत, तोपर्यंत जिल्हास्तरावर या लसीकरण मोहिमेचे योग्य नियोजन करणे शक्य नसल्याचे जिल्हा आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सध्यातरी उपलब्ध लसीच्या माध्यमातून लाभार्थींना लसीकरण केले जात असून, नवीन मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा केली जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या सुरू असलेली केंद्र - ९०
जिल्ह्यात एकूण लसीकरण केंद्र - १५३
दररोज लस देण्याचे टार्गेट- ४५००
प्रत्यक्षात लस दिली जाते - ६०००
आतापर्यंत ४० टक्के टार्गेट पूर्ण
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोल्यात लसीकरण मोहिमेला लाभार्थींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, लसीचा तुटवडा भासत असल्याने मोहीम प्रभावित होत आहे.
पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थींची संख्या लक्षणीय आहे, त्या तुलनेत दुसरा डाेस घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. लस मिळत नसल्याने अनेक जण लसीचा दुसरा डोस उशिरा घेत असल्याचे दिसून येत आहे.
१ मेपासून कोविड लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढणार आहे. त्या तुलनेत लसीचा पुरवठा होण्याची अपेक्षा आहे. मात्र, लस उपलब्ध न झाल्यास आरोग्य विभागासमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ज्या प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. त्यानुसार लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला लाभार्थींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील लाभार्थींना लस देणार असल्याचे जाहीर केले असले तरी त्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नाहीत. यासंदर्भात मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच मोहिमेला सुरुवात करण्यात येईल.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला