अकोल्यात अर्धा तास मुसळधार
By admin | Published: September 15, 2014 02:04 AM2014-09-15T02:04:05+5:302014-09-15T02:04:05+5:30
नाल्या तुंबल्या, रस्त्याचे झाले तलाव
अकोला : रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास शहरात अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. यामुळे शहरातील विविध भागात नाल्या तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले. जिल्ह्यात आजपर्यंत ५२४.७२ मिमी पाऊस झाला असून, ही टक्केवारी वार्षिक सरासरीच्या ८३ इतकी आहे.
रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. अचानक पाऊस आल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळपासूनच पाऊस येण्याची शक्यता नसल्यामुळे गांधी चौक, जय हिंद चौक, पोस्ट ऑफीस कार्यालयासमोर कापड व्यावसायिक व छोट्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती. अचानक जोरदार पाऊस आल्यामुळे या व्यावसायिकांचे नुकसान झाले. अर्धा तास जोरदार पाऊस झाल्यामुळे दुर्गा चौक, महावितरण कार्यालय, सीताबाई कला महाविद्यालय परिसरातील नाल्या तुंबल्या व नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आले. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. सीताबाई कला महाविद्यालयासमोर रस्त्यावर तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचले होते. पाणी कमी होईपर्यंत वाहतूक ठप्प होती.