निम्मी तूर शेतकऱ्यांच्या घरातच!
By admin | Published: April 18, 2017 01:55 AM2017-04-18T01:55:14+5:302017-04-18T01:55:14+5:30
मुदतवाढ तोकडी : जिल्ह्यात ‘नाफेड’द्वारे दोन लाख क्विंटल तुरीची खरेदी
संतोष येलकर - अकोला
हमी दराच्या तूर खरेदीत ‘नाफेड’द्वारे जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रांवर सोमवारपर्यंत २ लाख २६ हजार ८५९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली; मात्र ‘नाफेड’द्वारे तूर खरेदीत खरेदी केंद्रांवर मोजमापासाठी करावी लागणारी प्रचंड प्रतीक्षा आणि बाजारात तुरीला कमी भाव मिळत असल्याने, जिल्ह्यात निम्मी अधिक तूर अद्याप तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. त्यामुळे हमी दराने तूर खरेदीसाठी ‘नाफेड’द्वारे देण्यात आलेली आठ दिवसांची मुदतवाढ तोकडी असल्याची स्थिती आहे.
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रतिक्विंटल ५ हजार ५० रुपये हमी दराने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यात अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या एका खरेदी केंद्रावर तूर खरेदी करण्यात येत आहे, तर अकोट, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा या चार ठिकाणी खरेदी केंद्रांवर ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी करण्यात येत आहे. खरेदी केंद्रांवर तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे; मात्र बारदान्याचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या असल्याने तूर खरेदी संथगतीने सुरू आहे. त्यामुळे दीड महिना उलटून जात असला, तरी तुरीच्या मोजमापासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. तुरीच्या मोजमापासाठी शेतकरी प्रतीक्षेत असतानाच १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजतापासून बंद करण्यात येणाऱ्या तूर खरेदीला नाफेडमार्फत २२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यावर्षी जिल्ह्यात तुरीचे उत्पादन चांगले झाल्याने खरेदी केंद्रांवर तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रांवर १७ एप्रिलपर्यंत २ लाख २६ हजार ८५९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली; मात्र नाफेडद्वारे संथतीने करण्यात येत असलेली तूर खरेदी, मोजमापाला होणारा प्रचंड विलंब आणि बाजारात व्यापाऱ्यांकडून तुरीला मिळणारा कमी भाव यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तूर उत्पादक शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्रांवर आणि बाजारात तूर विकण्यासाठी आणणे टाळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात निम्म्यापेक्षा अधिक तूर अद्याप शेतकऱ्यांच्या घरातच पडून असल्याची स्थिती आहे. या पृष्ठभूमीवर हमी दराने तूर खरेदीसाठी नाफेडद्वारे देण्यात आलेली आठ दिवसांची मुदतवाढ अत्यंत तोकडी असून, तूर खरेदीला महिनाभराची मुदतवाढीची गरज असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
खरेदीची गती वाढवा; मुदतवाढ एक महिन्याची द्या!
नाफेडद्वारे तूर खरेदीत तुरीच्या मोजमापाला दीड-दोन महिन्याची प्रतीक्षा करावी लागत आहे आणि बाजारात तुरीला कमी भाव मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांनी निम्म्यापेक्षा अधिक तूर विकण्यासाठी न आणता घरातच ठेवली आहे. त्यामुळे नाफेडमार्फत तूर खरेदीची गती वाढविण्यात यावी आणि हमी दराने तूर खरेदी करण्यासाठी १५ मेपर्यंत महिनाभराची मुदतवाढ दिली पाहिजे, अशी मागणी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांच्यासह अकोला तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष गजानन पावसाळे, देवेंद्र देवर,, गोवर्धन काकड (सांगळूद), ज्ञानेश्वर महल्ले (दुधलम),सुनील गोंडचवर (खरप खुर्द, रवींद्र अवचार (कोठारी) इत्यादी शेतकऱ्यांनी केली आहे.
‘नाफेड’द्वारे खरेदी करण्यात आलेली अशी आहे तूर!
नाफेडद्वारे जिल्ह्यातील सातही तालुक्यातील तूर पाच खरेदी केंद्रांवर करण्यात येत आहे. पाचही खरेदी केंद्रांवर १७ एप्रिलपर्यंत २ लाख २६ हजार ८५९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यामध्ये अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अकोला, पातूर व बाळापूर या तीन तालुक्यातील ७७ हजार ६७९ क्विंटल, तेल्हारा खरेदी केंद्रावर २७ हजार ५०० क्विंटल, बार्शीटाकळी खरेदी केंद्रावर ३४ हजार ७०० क्विंटल, अकोट येथील खरेदी केंद्रावर ५२ हजार क्विंटल आणि मूर्तिजापूर येथील खरेदी केंद्रावर ३५ हजार क्विंटल तूर करण्यात आली आहे.
तीन लाख क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरात!
हमी दराने नाफेडद्वारे तूर खरेदी केंद्रांवर तुरीच्या मोजमापासाठी दीड महिना करावी लागणारी प्रतीक्षा आणि बाजारात व्यपाऱ्यांकडून तुरीला कमी भाव मिळत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत १७ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात २ लाख २६ हजार ८५९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असली तरी, त्यापेक्षा अधिक तीन क्विंटल तूर अद्याप शेतकऱ्यांच्या घरातच पडून असल्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.