मूर्तिजापूर तालुक्यातील निम्मी गावे पोलीस पाटलांविनाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:18 AM2021-09-25T04:18:52+5:302021-09-25T04:18:52+5:30
संजय उमक मूर्तिजापूर : पोलीस, प्रशासन यांच्यातील शासकीय दुवा असलेल्या पोलीस पाटील यांच्यावर गावातील कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक समस्या ...
संजय उमक
मूर्तिजापूर : पोलीस, प्रशासन यांच्यातील शासकीय दुवा असलेल्या पोलीस पाटील यांच्यावर गावातील कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक समस्या सोडविणे, अशा विविध गोष्टींच्या जबाबदाऱ्या असताना तालुक्यातील १६४ गावांपैकी केवळ ७३ गावांत पोलीस पाटील कार्यरत असून, ७२ गावे पोलीस पाटलांविनाच वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.
गावची मुख्य व्यक्ती म्हणून शिवकालीन पोलीस पाटील पद अस्तित्वात आले. पूर्वी पोलीस पाटील पद वंशपरंपरागत होते. १७ डिसेंबर १९६७ रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम हा कायदा करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक गावाला स्वतंत्र पोलीस पाटील नेमण्यात आले. कायद्यात तरतूद असलेल्या कामांबरोबरच गावातील सण, उत्सव, यात्रा, राजकारण, निवडणुका या सर्वच घडामोडीवर पोलीस पाटील लक्ष ठेवून असतात. ग्रामपंचायत व वेगवेगळ्या निवडणुकांच्या काळात पोलीस पाटील गावपातळीवरील हालचालींबाबत पोलीस प्रशासनाला माहिती उपलब्ध करून देत असतो. तालुक्यातील ७२ गावांना पोलीस पाटीलच नसल्याने गावात होणाऱ्या विविध गुन्ह्यांना वाव मिळत आहे.
---------------------
केवळ ७३ गावात पोलीस पाटील कार्यरत
मूर्तिजापूर तालुक्यात ७३ गावांत पोलीस पाटील कार्यरत असून, ७२ गावे अनेक वर्षांपासून पोलीस पाटलांविनाच आहेत. यात ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील ४० गावे, माना पोलीस ठाणे २९, पिंजर पोलीस ठाणे हद्दीतील दोन गावांचा समावेश आहे. स्थानिक मूर्तिजापूर शहरालाही पोलीस पाटील नाही. उपरोक्त गावातील काही पोलीस पाटील नियुक्ती वयोमर्यादेनुसार सेवानिवृत्त झाले, तर काहींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून तालुक्यातील निम्म्या गावांना पोलीस पाटलांची प्रतीक्षा आहे.