रुग्णांचे रेमडेसिविर इंजेक्शन बाहेर विकणाऱ्या सात जणांना ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 10:41 AM2021-04-28T10:41:07+5:302021-04-28T10:41:25+5:30
Rmedivir injections Blackmarket : होटेल रीजन्सी येथे काम करणाऱ्या युवतीसह मेडिकल व हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या युवकांचा समावेश आहे.
अकोला : होटेल रीजन्सी कोविड केअर सेंटरसह शहरातील विविध रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांचे रेमडेसिविर इंजेक्शन चोरून ते बाहेर अधिक दराने विकणाऱ्या सात जणांना स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री बेड्या ठोकल्या. या सात जणांमध्ये होटेल रीजन्सी येथे काम करणाऱ्या युवतीसह मेडिकल व हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या युवकांचा समावेश आहे. या सात जणांनी तब्बल वीस इंजेक्शनची काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.
डाबकी रोडवरील रहिवासी निकिता नारायण वैरागडे वय २५ वर्ष ही रीजन्सी हॉटेल येथील कोविड सेंटरमध्ये कामाला होती तर कार्तिक मोहन पवार वय २० वर्ष राहणार शिवनगर मोठी उमरी हा देशमुख मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कामाला होता. या दोघांसह गौतम नरेश निदाने वय २० वर्ष राहणार शिवाजी नगर हा युनिक हॉस्पिटल कोविड केअर सेंटर येथे कामाला होता. अभिषेक जगदीश लोखंडे वय २२ वर्षे राहणार मोठी उमरी, शुभम दिनेश वराडे वय २० वर्ष राहणार लाडीस फाईल, अकोट फाईल, देवेंद्र संजय कपले वय २२ वर्षे राहणार मोठी उमरी व अंकित संतोष तिकांडे वय १८ वर्षे राहणार मोठी उमरी या सात जणांनी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची इंजेक्शन त्यांना न देता त्या इंजेक्शनची चोरी केली. त्यानंतर या इंजेक्शनची शहरातील विविध कोविड केअर सेंटर तसेच हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना काळ्या बाजारात चढ्या दराने मोठ्या प्रमाणात विक्री केली. या प्रकाराची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने या सातही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची दोन दिवस कसून चौकशी केल्यानंतर या आरोपींनी रुग्णांचे रेमडेसिविर इंजेक्शन बाहेर विकल्याची कबुली दिली. रुग्णांचे तब्बल वीस रेमडेसिविर इंजेक्शन या सात जणांनी बाहेर विकले असून, या माध्यमातून तब्बल दीड ते दोन लाख रुपयांची उलाढाल त्यांनी केली आहे. याप्रकरणी सातही आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा तसेच अन्न व औषध प्रशासन सौंदर्य प्रसाधन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सातही आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
डॉक्टरांनाही हलगर्जी भोवणार
जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. अशातच ज्या रुग्णांकडून लाखो रुपयांची रक्कम कोविड केअर सेंटर संचालक तसेच हॉस्पिटलचे संचालक उकळत आहेत, त्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन न देता त्याची परस्पर विक्री करण्यात येत होती. या प्रकाराला डॉक्टरची हलगर्जी तसेच निष्काळजीही जबाबदार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे हीच हलगर्जी आता डॉक्टरांनाही भोवणार असल्याची माहिती आहे. ज्या कोविड केअर सेंटरमधून रुग्णांचे रेमडेसिविर इंजेक्शन चोरून बाहेर विकल्या गेले त्या डॉक्टरांवरही लवकरच फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.