अकोल्यात हापूस दाखल; मात्र दर आवाक्याबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 10:13 AM2021-03-28T10:13:48+5:302021-03-28T10:13:55+5:30
Hapus mango in Akola हंगामातील पहिला हापूस आंबा हा शहरातील सगळ्याच बाजारपेठांमध्ये दाखल झाला आहे.
अकोला : मार्चअखेर हापूस आंबा अकोल्यातील बाजारपेठेत दाखल झाला; मात्र दर जास्त असल्याने ग्राहकांकडून मागणी कमी आहे. पुढील आठवड्यात मागणी वाढण्याची शक्यता आहे. हंगामी फळांनी सध्या बाजारपेठा सजल्या आहेत. अशात आता आंबा प्रेमींसाठीही एक आनंदाची बातमी आहे. हंगामातील पहिला हापूस आंबा हा शहरातील सगळ्याच बाजारपेठांमध्ये दाखल झाला आहे. दरातील तेजीचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अनेक जिल्ह्यांमध्ये आंबा लवकर बाजारात आणला आहे. कोरोनामुळे सध्या उठाव कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अकोल्याच्या बाजारात काही दिवसांपासून आंबा दाखल झाला आहे. सरासरी प्रत्येक व्यापाऱ्यांकडे २० ते ४० पेटी माल विक्रीसाठी आहे. मागणीत वाढ झाल्यास आवक वाढून दरही कमी होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
बाजारात आंबा दाखल झाला असला तरी कोरोनामुळे ग्राहकांतून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. पुढील आठवड्यात परिस्थिती सुधारेल.
कमलेश बागवान, फळे व भाजीपाला व्यापारी
असा आहे आंब्यांचा दर
देवगड हापूस एक डझनाचा दर किमान ११००, कमाल १२०० रुपये सरासरी एक हजार रुपये तर रत्नागिरी हापूस ७०० एक डझन पेटीचा आहे. तर बादाम १०० रुपये किलो, गुलाबकेसर १६० रुपये किलो, लालबाग १२० रुपये किलो मिळत आहे.