सासर मंडळींकडून छळ, विवाहितेची गळफास लावून आत्महत्या
By नितिन गव्हाळे | Published: September 8, 2023 09:44 PM2023-09-08T21:44:27+5:302023-09-08T21:44:37+5:30
अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील घटना, पाच जणांविरूद्धगुन्हा दाखल
अकोला: सासरच्या मंडळींच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका २३ वर्षीय विवाहितेने अकोलखेड येथे गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना २ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणात अकोट फैल पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अकोलखेड येथील लता धनराज शेवाळे(४५) यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या २३ वर्षीय दिव्या नामक मुलीचे २०२० मध्ये पवन गणेश चैरागडे(३५) यांच्यासोबत विवाह झाला. त्यांना १६ महिन्यांचा एक मुलगा आहे. लग्नानंतर त्यांची मुलगी पतीसोबत आसामला गेली. तेथून परत आल्यावर काही दिवस सुरळीत गेल्यानंतर सासू उषा चैरागडे ही तुला स्वयंपाक करता येत नाही. भांडे व्यवस्थित घासत नाही. असे टोमणे मारायची. तसेच नणंद अनुराधा पवन कावरे(३२) रा. अचलपूर, वैष्णवी उर्फ टिना वर्मा(२७) रा. अकोट, ह.मु. अकोलखेड यासुद्धा टोमणे मारायच्या.
शिवीगाळ करायच्या. याबाबत अनेकदा दिव्याने पती पवन चैरागडे याला सांगितले. परंतु त्याने लक्ष दिले नाही. सासू, सासरे व नणंद यांचा त्रास वाढल्याने, दिव्या चैरागडे हिने राहत्या घरात पंख्याला ओढणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप दिव्याची आई उषा शेवाळे यांनी तक्रारीतून केला आहे. तक्रारीनुसार अकोट ग्रामीण पोलिसांनी पतीसह पाच जणांविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पती, सासरा द्यायची सतत धमकी
विवाहिता दिव्या ही सासू, नणंद व सासऱ्याकडून होणाऱ्या त्रासबाबत पती पवन याला सांगायची. परंतु तो, त्यांच्याबद्दल मला काही सांगू नको. माझे डोके खराब होते. आता पुन्हा त्यांचे गाऱ्हाणे सांगितले तर मी बंदुकीतून डाेक्यात गोळी मारून घेईल. अशी धमकी द्यायचा. त्यामुळे मुलगी दिव्या ही सासरी जायची. तसेच सासरेसुद्धा आम्हाला फक्त नातवाशी मतलत आहे. नाहीतर तुला फारकती देऊन दुसरे लग्न केले असते. असे म्हणायचे. असेही उषा शेवाळे यांनी तक्रारीत नमुद केले आहे.