हार्दिक पटेलच्या मार्गदर्शनात शुक्रवारी अकोल्यात युवा एल्गार मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 02:12 PM2018-03-21T14:12:30+5:302018-03-21T14:12:30+5:30
अकोला : विदर्भातील शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांच्या न्याय्य हक्कासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने उभारलेल्या युवा आक्रोश मोर्चानंतर गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ युथ फोरमद्वारे युवा एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अकोला : विदर्भातील शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांच्या न्याय्य हक्कासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने उभारलेल्या युवा आक्रोश मोर्चानंतर गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ युथ फोरमद्वारे युवा एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अकोल्यातील मेळाव्याचे स्वागताध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ समन्वयक संग्राम गावंडे असल्याने हा मेळावा राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे.
लोकसभा, विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बांधणी सुरू केली असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही कंबर कसली आहे. त्या दृष्टीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विदर्भात गत सहा महिन्यात दौरे केले. राष्ट्रवादीची यंग ब्रिगेड असलेल्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी विदर्भातील दमदार नेतृत्व संग्रामभैया गावंडे यांची विदर्भ समन्वयकपदी वर्णी लावत पक्षाची धुरा युवा नेतृत्वाकडे दिली. संग्राम गावंडे यांनी विदर्भात सभा, बैठका, मेळाव्यांचा धडाका लावत शहरासह ग्रामीण भागात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विदर्भातील शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नांवर संग्राम कोते पाटील यांच्या मार्गदर्शनात संग्राम गावंडे यांनी अकोला, वाशिम, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली येथे युवा आक्रोश मोर्चे काढून सत्ताधारी भाजपविरुद्ध रणशिंग फुंकले. या मोर्चात युवाशक्तीचा वाढता सहभाग राष्ट्रवादीला नवचेतना देणारा ठरला. राष्ट्रवादीची ही वाढती घौडदौड अशीच कायम ठेवण्यासाठी संग्राम गावंडे यांनी आता विदर्भ युथ फोरमच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अकोल्यात शुक्रवारी गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत एल्गार मेळावा आयोजित केला आहे. विदर्भ युथ फोरमच्या माध्यमातून घेण्यात येणारा हा मेळावा बिगर राजकीय असल्याचे सांगण्यात येत असले तरी संग्राम गावंडे या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष असल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ता डॉ. सुधीर ढोणे मेळाव्याचे अध्यक्ष आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस सरकारविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने हातात हात घेतल्याचे यावरून दिसून येत आहे. गुजरातमध्ये काँग्रेसची ताकद वाढविणारे हार्दिक पटेल या मेळाव्याचे मुख्य बिंदु आहेत.