पान पिंपळी वनऔषधी पिकाला येणार सुगीचे दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:13 AM2021-07-02T04:13:57+5:302021-07-02T04:13:57+5:30
पान पिंपळी पिकाला आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्व आहे. औषधी गुणांमुळे ही पान पिंपळी ओळखली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली वाढती ...
पान पिंपळी पिकाला आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्व आहे. औषधी गुणांमुळे ही पान पिंपळी ओळखली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली वाढती मागणी पाहता, दरामध्ये भरघोस वाढ होत आहे. त्यामुळे पान पिंपळी उत्पादक शेतकरी खूश आहेत. गेल्या आठ, दहा वर्षांपासून या पिकावर सतत निसर्गाचा कोप व शासनाच्या मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदानामुळे या भागातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशाही परिस्थितीवर मात करीत, महागड्या खर्चाचे पान पिंपळी हे वनौषधी पीक जिवंत ठेवण्याचे काम या भागातील शेतकरी करीत आहेत.
यापूर्वी पिकाला ३०० ते ३५० रुपये प्रतिकिलो इतका दर मिळत होता. परंतु या भागातील पान पिंपळी पिकाला कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चांगली मागणी आहे. त्यामुळे पान पिंपळीचे भाव चांगलेच वधारले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पान पिंपळीची वाढती मागणी पाहता, पान पिंपळीचे आगामी काळात भाव तेजीत राहणार आहेत.
फोटो:
कोरोनावर गुणकारी औषध
पान पिंपळी हे वनौषधी पीक असल्यामुळे आणि त्यामध्ये असलेले गुणधर्म पाहता, मागणी वाढत आहे. सद्य:स्थितीत कोरोनाची भयानक स्थिती पाहता व शास्त्रीय अवलोकनानुसार कोरोनावर पिंपळी हे एक गुणकारी औषध म्हणून उपयोगात आणले जात आहे. त्यामुळे या पिकाचे भाव तेजीत राहणार हे निश्चित आहे, असे पान पिंपळी उत्पादक शेतकरी शहादेवराव ढगे यांनी सांगितले.
...म्हणून मिळतोय चांगला दर
कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून काही आयुर्वेद तज्ज्ञ औषधी म्हणून पान पिंपळीचा उपयोग करीत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पिंपळीची मागणी वाढत आहे. त्यामुळे या वर्षी पान पिंपळीला चांगला भाव मिळत असल्याचे अकोट येथील व्यापारी गोपाल माकोडे यांनी सांगितले.
पान पिंपळी लागवडीसाठी येणारा महागडा खर्च पाहता आणि कमी दरामुळे पान पिंपळीचे उत्पादन कमी झाले. पीक परवडत नव्हते. परंतु गत काही दिवसांपासून पान पिंपळीला चांगला दर मिळत असल्यामुळे आणि येत्या काळात चांगले दर मिळाल्यास पान पिंपळीचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.
- सुनीलकुमार धुरडे, शेतकरी