हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे का भाऊ...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:24 AM2021-08-18T04:24:38+5:302021-08-18T04:24:38+5:30
कोरोना काळात हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ते आताच भरून येणार नाही; परंतु गत काही दिवसांपासून निर्बंध शिथिल ...
कोरोना काळात हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ते आताच भरून येणार नाही; परंतु गत काही दिवसांपासून निर्बंध शिथिल झाल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री १० पर्यंत उघडी ठेवण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात हॉटेल व्यवसाय रुळावर आला आहे. यामुळे या व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे.
शहरातील हॉटेल्स
४५०
सध्या सुरू असलेले हॉटेल्स
४५०
हॉटेल कर्मचाऱ्यांची संख्या
२२५०
काहींचे लसीकरण पूर्ण, काहींचे बाकी!
हॉटेल १
शहरातील मूर्तिजापूर रोडवरील एका हॉटेलची पाहणी करण्यात आली. यामध्ये येथील ३ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले. ३ कर्मचाऱ्यांचे बाकी असून त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यावर कामावर ठेवण्यात येणार आहे.
हॉटेल २
जवळच असलेल्या बाळापूर रोडवरील एका हॉटेलची पाहणी केली असता येथे काही कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले नसल्याचे निदर्शनास आले. लसीकरण झाले नसतानाही हे कर्मचारी कामावर होते. तर २ कर्मचाऱ्यांचेच लसीकरण झाले आहे.
बहुतांश कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण
शासनाने निर्बंधामध्ये सूट दिल्याने हॉटेल व्यवसाय पूर्वपदावर आले आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक आनंदी असून सर्वच ठिकाणी कोरोनाचे नियम पाळून व्यवसाय सुरू आहे. यामध्ये शासनाने लसीकरणाची अट घालून दिल्याने कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांचे लसीकरण आटोपले आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले, अशांनाच कामावर ठेवण्यात येत आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी लवकरच संघटनेकडून लसीकरण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
- योगेश अग्रवाल, अध्यक्ष, हॉटेल व्यावसायिक संघटना
रस्त्यांवरील टपऱ्यांवर आनंदीआनंद
लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा रस्त्यांवरील टपरीधारकांना बसला आहे. हातावर पोट असल्याने उपासमारीची वेळ आली होती.
निर्बंधांत सूट मिळाल्याने चहा टपरीधारकांचे व्यवसाय पूर्ववत झाले असून आनंदीआनंद आहे.
शहरात असे शेकडो चहा टपरीधारक आहे; परंतु या टपरीधारकांपैकी काहींचेच लसीकरण झाले आहे.
कुठे मालकांचे लसीकरण झाले तर कर्मचाऱ्यांचे बाकी असल्याचे पाहणीत निदर्शनास आले.