रक्तदान जनजागृतीसाठी ‘तो’ करतोय तब्बल ५७०० किमीची पदयात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 05:46 AM2022-07-28T05:46:40+5:302022-07-28T05:46:48+5:30
तिरुवनंतपूरमपासून प्रवास सुरू : २१ हजार किमी चालण्याचा संकल्प
अतुल जयस्वाल
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : केवळ रक्त न मिळाल्याने कोणाचा मृत्यू होता कामा नये, यासाठी रक्तदानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने केरळमधील तिरवनंतपूरम येथून २८ डिसेंबर २०२१ पासून पदयात्रेस सुरुवात केलेला दिल्ली येथील किरण वर्मा (३७) हा अवलीया तब्बल ५७०० किलोमीटरचा पायी प्रवास करत मंगळवारी अकोल्यात पोहोचला. कशाचीही तमा न बाळगता पदभ्रमंतीवर असलेल्या या तरुणाने येत्या दोन वर्षांत २१ हजार किलोमीटर प्रवास करत दिल्लीला पोहोचण्याचा संकल्प केला आहे.
दिल्ली येथील एका मोठ्या शिक्षण समूहातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून २०१६ पासून रक्तदान चळवळीसाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या किरण वर्मा यांनी ‘चेंज विथ वन फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेंतर्गत ‘सिंपली ब्लड’ व ‘चेंज विथ वन मिल’ हे दोन उपक्रम सुरू केले आहेत. वर्मा यांनी केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात या राज्यातील तसेच पुदुच्चेरी व दिव-दमन या केंद्रशासित प्रदेशांमधील ७२ जिल्ह्यांमधून पायी प्रवास केला आहे.
...म्हणून झोकले रक्तदान चळवळीत
वर्मा यांनी २६ डिसेंबर २०१६ रोजी छत्तीसगढमधील रायपूर येथील एका रुग्णासाठी डोनर म्हणून रक्त दिले होते. त्यांनी मोफत दिलेल्या रक्तासाठी एका मध्यस्थाने त्या रुग्णाकडून १५०० रुपये वसूल केले. वैद्यकीय बिल भरण्यासाठी त्या रुग्णाच्या पत्नीला देहविक्रय करावा लागल्याची माहिती किरण वर्मा यांना मिळाली, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्याच दिवशी त्यांनी नोकरी सोडली व वर्ष २०२५ पर्यंत देशात रक्ताअभावी कोणाचाही मृत्यू होऊ नये, यासाठी कार्य करण्याचे ध्येय निश्चित केले. पदयात्रा सुरू केल्यापासून त्यांच्या समर्थनार्थ आतापर्यंत विविध ठिकाणी ४२ रक्तदान शिबिरे आयोजित केली.
नंदुरबार, धुळे, जळगाव व बुलडाणा असा प्रवास करत ते २६ जुलै रोजी अकोला येथे आले. येथे त्यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची भेट घेतली व बुधवारी ते पुढील प्रवासासाठी रवाना झाले. येथून ते अमरावती, नागपूर व इतर जिल्ह्यांमध्ये जाणार आहेत.
रक्तदानासाठी स्वेच्छेने लोक पुढे आले तर देशात रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही व कोणालाही रक्ताअभावी प्राण गमवावे लागणार नाहीत.
- किरण वर्मा, प्रणेता, ‘चेंज विथ वन फाउंडेशन’, नवी दिल्ली