मुख्यालयी राहण्याच्या नियमाची पायमल्ली
By admin | Published: May 28, 2014 09:49 PM2014-05-28T21:49:09+5:302014-05-28T22:17:48+5:30
आदेशाला केराची टोपली दाखवून शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, डॉक्टर, ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहायक, तलाठी हे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली आहेत.
बाळापूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, डॉक्टर, ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहायक, तलाठी यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश आहेत; मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवून हे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली आहेत. अनेक प्रा. आ. केंद्रांचे वैद्यकीय अधिकारीसुद्धा मुख्यालयी राहत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. मुख्यालयी राहत असल्याचे दाखवून भाडे वसुलीत मात्र हे कर्मचारी मागे नाहीत. तालुक्यातील पारस, वाडेगाव, हातरुण, निमकर्दा, उरळ, गायगाव, रिधोरा, तामशी, नकाशी, अंदुरा ही गावे मोठी असून, या ठिकाणी शासकीय कर्मचारी मुख्यालयी असणे गरजेचे आहे. गावाच्या विकासाच्या किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण जनतेला विशेष माहिती नसते. शासन व गाव यांच्यातील मुख्य दुवा ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहायक, शिक्षक, तलाठी, डॉक्टर आहे. त्यामुळे सदर कर्मचारी व अधिकारी मुख्यालयात राहणे आवश्यक आहे. शासकीय सेवेमध्ये रुजू होताना मुख्यालयात राहण्याची अट असते. त्यासाठी त्यांना विविध सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच मुख्यालयी राहण्याचा भत्तासुद्धा दिला जातो; परंतु या आदेशाला न जुमानता गरजेनुसार राहणे व मुख्यालयी राहण्याचे कर्तव्य समजून न घेता आपल्या मर्जीप्रमाणे शासकीय कर्मचारी वागत आहेत. अकोला जिल्हा परिषद प्रशासनाने काही महिन्याआधी तालुक्यातील कर्मचार्यांचा आढावा घेतला होता. यानंतर मात्र ही मोहीम थंडावली. ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, कृषी सहायक, तलाठी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे; मात्र तालुक्यातील कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. बहुतांश कर्मचारी अकोल्यातून अप-डाऊन करतात. या कर्मचार्यांवर नियंत्रण ठेवणारे अधिकारीसुद्धा अप-डाऊन करीत असल्याने कर्मचार्यांवर कोणाचाही वचक नसल्याचे दिसत आहे.