चुकीच्या माहितीसाठी शिक्षकासह मुख्याध्यापकही जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:35 PM2019-06-10T12:35:37+5:302019-06-10T12:35:46+5:30
चुकीची माहिती शिक्षकांनी भरल्यास त्यांच्यासह मुख्याध्यापकालाही जबाबदार धरून कारवाई करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले.
अकोला: जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी गेल्या वर्षी शिक्षकांनी खोटे अंतर, आजाराची चुकीची माहिती दाखवून सोयीच्या जागा पटकावल्या. ही बाब उघड झाल्यानंतर शिक्षकांवर कारवाई करणे कठीण झाले. आता चुकीची माहिती शिक्षकांनी भरल्यास त्यांच्यासह मुख्याध्यापकालाही जबाबदार धरून कारवाई करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले. त्यामुळे अर्ज आणि माहिती भरण्याची प्रक्रिया मुख्याध्यापकांना डोळ््यात तेल घालून करण्याची वेळ आली आहे.
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी शासनाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी सुधारित धोरण निश्चित केले. त्यामध्ये बदलीपात्र शिक्षकांची व्याख्या देण्यात आली. त्या आदेशातील बदलीपात्र शिक्षकाच्या व्याख्येत ग्रामविकास विभागाने ८ मार्च २०१९ रोजी बदल केला. त्यामध्ये बदलीपात्र शिक्षक म्हणजे, ज्या शिक्षकाची बदलीस निश्चित धरावयाची सेवा १० वर्षे पूर्ण झाली आहे आणि विद्यमान शाळेत त्या शिक्षकाची सेवा किमान तीन वर्षे पूर्ण झाली आहे, असा बदल केला आहे. या बदलानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित शिक्षकाची सर्वसाधारण व अवघड क्षेत्रात १० वर्षे सेवा झाली असल्यास ते शिक्षक बदलीपात्र समजण्यात आले; मात्र सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षक एकदा बदली झाल्यानंतर जोपर्यंत अवघड क्षेत्रात जात नाहीत, तोपर्यंत ते बदलीसाठी पात्र ठरतात. त्यामुळे नवीन धोरणानुसार त्यांची दरवर्षी बदली होऊ शकते, ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेतून न्यायालयापुढे मांडण्यात आली. त्यावेळी शासनाने बदलीपात्र शिक्षकांची संगणकीय प्रणालीद्वारे एकदा बदली झाल्यानंतर पुन्हा तीन वर्षे त्यांची बदली केली जाणार नाही, असे न्यायालयात स्पष्ट केले. त्यासाठी बदली प्रक्रियेचा २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या बदल करण्यात आला. अकोला जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेसाठी ट्रान्सफर पोर्टल सुरू झाले आहे. त्याची मुदत ११ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. ट्रान्सफर पोर्टलसाठी मुख्याध्यापकांचे लॉगिन महत्त्वाचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून सोयीच्या ठिकाणी बदली मिळवली तर त्यासाठी शिक्षकासोबतच संबंधित मुख्याध्यापकालाही जबाबदार धरले जाणार आहे. लॉगिनवरून कोणताही शिक्षक चुकीची माहिती भरणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. बदली प्रक्रियेशी संबंधित अडचणीसाठी पंचायत समितीमध्ये मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला. तसेच संवर्ग दोनमध्ये गुगल मॅपिंगनुसार सर्वात जवळचे अंतर गृहीत धरले जाणार आहे.