मुख्याध्यापक पदाच्या लालसेने भरली झोळी!
By Admin | Published: February 9, 2016 02:22 AM2016-02-09T02:22:24+5:302016-02-09T02:22:24+5:30
मनपा शिक्षकांजवळून उकळली अग्रीम रक्कम
आशीष गावंडे / अकोला: मुख्याध्यापक पदाच्या लालसेपायी महापालिकेच्या १४ शिक्षकांनी प्रामाणिकता गहाण ठेवत शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचार्यांच्या झोळीत पैशांचे दान टाकले. आर्थिक गैरव्यवहाराचा डाग लागलेल्या या विभागाने बदनामीची तमा न बाळगता संबंधित शिक्षकांजवळून चक्क अग्रीम रक्कम उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाने गोरगरीब विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी आजपर्यंत कोणते प्रयत्न केले, हा संशोधनाचा विषय आहे. २00६-0७ पासून शिक्षण विभागात सुरू असलेली घोटाळ्य़ांची मालिका आजही कायम असल्याचे दिसून येते. विषय तज्ज्ञांच्या नियमबाह्य नियुक्तीचे प्रकरण राज्यभर गाजले होते. याप्रकरणी प्रामाणिकतेचा आव आणणार्या अधिकार्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल झाले. हा प्रकार कमी म्हणून की काय, सर्व शिक्षा अभियानमार्फत वर्ग खोल्यांच्या बांधकामातील भ्रष्टाचार असो वा अपंग समावेशित विद्यार्थ्यांच्या साहित्य वाटपातील घोळ, या सर्व प्रकरणांमुळे शिक्षण विभाग सतत प्रकाशझोतात राहिला. शिक्षण विभागाच्या कामकाजात सुधारणा होईल, ही अपेक्षा असतानाच जून २0१५ मध्ये खिचडीच्या कंत्राट वाटपात ९ लाखांचा गैरव्यवहार झाला. हा वाद शमत नाही तोच आता शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार पार पडल्याची माहिती आहे. या प्रक्रियेत काही शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्यांचा सक्रिय सहभाग असून, पदाधिकार्यांच्या माध्यमातूनच इच्छुक १४ शिक्षकांची यादी तयार झाली. मुख्याध्यापक पद मिळाल्यास आपसूकच नियमानुसार वेतनवाढ होणार असल्याने पदोन्नतीच्या बदल्यात एक ते सव्वा लाख रुपयांचा दर ठरल्याची माहिती आहे. यातील काही रक्कम अग्रीमच्या नावाखाली शिक्षण विभागापर्यंत पोहोचवण्यात आली. शिक्षण विभागाच्या या प्रतापामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.