मुख्याध्यापक, शिक्षकांवरील प्रस्तावित कारवाई थांबवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:23 AM2021-08-27T04:23:22+5:302021-08-27T04:23:22+5:30
अकोला : जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शाळा भेटीदरम्यान करण्यात आलेल्या तपासणीच्या आधारे दोषी गृहीत धरून संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांवरील ...
अकोला : जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शाळा भेटीदरम्यान करण्यात आलेल्या तपासणीच्या आधारे दोषी गृहीत धरून संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांवरील प्रस्तावित शिस्तभंगाची कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद शिक्षक संघटना संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळा भेटीदरम्यान जिल्ह्यातील काही शाळांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये संबंधित शाळांमध्ये अनुपस्थित आढळून आलेल्या काही मुख्याध्यापक व शिक्षकांना दोषी गृहीत धरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जात आहे. परंतु कोरोनाकाळात शिक्षक गृहभेटीद्वारे अध्यापनाचे कार्य करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाळा तपासणीच्या आधारे दोषी गृहीत धरून मुख्याध्यापक व शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई झाल्यास शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण होणार असून, त्यांच्या शैक्षणिक कार्यावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांवरील प्रस्तावित कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद शिक्षक संघटना संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष विजय टोहरे, शिक्षक संघटना संघर्ष समितीचे समन्वयक राजेश देशमुख, हमीद शारिक, गोपाल सुरे, मारोती वरोकार, मंगेश दसोडे, शंकर डाबेराव, ग.ल. पवार, विलास मोरे, पुंडलिक भदे, महेंद्र भगत आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या शाळा भेटीदरम्यान, काही शाळा बंद आढळून आल्या असून, मुख्याध्यापक व शिक्षक शाळांमध्ये अनुपस्थित आढळून आले. परंतु काेरोनाकाळात शिक्षक गृहभेटीद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य करीत असल्याने, शाळा तपासणीच्या आधारे दोषी गृहीत धरून संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांवरील प्रस्तावित शिस्तभंगाची कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी आम्ही प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.
विजय टोहरे,
अध्यक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्था
.............फोटो.................