महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोल्यातून नागपूरला स्थलांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 11:08 AM2021-02-06T11:08:52+5:302021-02-06T11:09:17+5:30
Maharashtra Livestock Development Board ५ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार हे मुख्यालय नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आले.
अकोला : राज्याच्या मागासलेल्या भागात संकरीत पैदासीच्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून दुग्ध उत्पादन व ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीस उत्तेजन देण्यासाठी राज्यात महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली होती. त्याचे मुख्यालय मागील १८ वर्षांपासून अकोला येथे कार्यरत आहे. ५ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार हे मुख्यालय नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आले. शासन निर्णयानुसार, अकोल्यात महाराष्ट्र राज्य पशुधन विकास मंडळाच्या मुख्यालयासाठी स्वत:ची इमारत नाही. तसेच इमारत बांधकामासाठी मंडळाची स्वत:ची जमीन उपलब्ध नाही. केंद्र शासनाचे प्रतिनिधी, मंडळाचे अध्यक्ष, आयुक्त पशुसंवर्धन तसेच संचालक मंडळातील इतर सदस्यांना मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी अकोला येथे आयोजित बैठकांना उपस्थित राहणे गैरसोईचे होत असल्याचे कारण देत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आले. नागपूर हे उपराजधानीचे देशातील मध्यवर्ती शहर असून दिल्ली, मुंबई, पुणे आदी शहरांतून नागपूरसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. नागपूर मुख्यालयी महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद ही शिखर संस्था, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व पशुवैद्यकीय महाविद्यालय असून सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे हे मंडळ नागपूर येथील जुने वळू संगोपन केंद्र येथे स्थलांतरित करण्यात आले.
पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोल्यात आवश्यक
पश्चिम विदर्भातील आर्थिक मागासलेपण लक्षात घेता ज्या उद्देशाने या स्वायत्त संस्थेची स्थापना झालेली आहे, त्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी हे मुख्यालय अकोल्यात असणे गरजेचे आहे. अकोल्यात कृषी विद्यापीठ तसेच पशु वैद्यकीय विज्ञान अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय असल्याने शेतकऱ्यांना कृषी आणि पशुधन विषयक सोयी-सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. त्या दृष्टिकोनातून पशुधन विकास मंडळाचे कार्यालय अकोला येथेच कायम ठेवणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्र्यांना निवेदन
पशुधन विकास मंडळाच्या कार्यालयाची प्रशासकीय इमारत तसेच आयुक्तांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी अकोला जिल्हा नियोजन समितीमार्फत सन २०१९-२० मध्ये ६.१० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले हाेते. या बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करून नजीकच्या काळात बांधकाम पूर्ण करणेसुद्धा शक्य आहे. ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोला येथून नागपूर येथे स्थलांतरित करण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनीधींनी मुख्यमंत्र्यांना दिले होते.