आरोग्य केंद्रातील डाॅक्टर, परिचारिकांना मुख्यालयी राहण्याची ‘अलर्जी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:21 AM2021-09-23T04:21:41+5:302021-09-23T04:21:41+5:30
मळसूर: पातूर तालुक्यातील मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व परिचारिकांना मुख्यालय राहण्याची ॲलर्जी आहे. डॉक्टर, परिचारिका दररोज अप-डाऊन ...
मळसूर: पातूर तालुक्यातील मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व परिचारिकांना मुख्यालय राहण्याची ॲलर्जी आहे. डॉक्टर, परिचारिका दररोज अप-डाऊन करीत असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर पोहोचू शकत नाही. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी तासन्तास ताटकळत बसावे लागते. असे प्रकार आरोग्य केंद्रात नेहमीच घडत असल्याने वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेसह अनेक रुग्ण उपचारासाठी दोन तास ताटकळत असल्याचा प्रकार बुधवारी दि.२२ सप्टेंबर रोजी उघडकीस आला आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये संतापाची लाट उसळली होती. हा प्रकार पहिल्यांदाच नव्हे, यापूर्वीसुद्धा अनेक वेळा उघडकीस आला आहे. याकडे संबंधित आरोग्य विभागाच्या वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहे. संबंधित आरोग्य विभागाला अजून किती बळींची आवश्यकता आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावा या उद्देशाने व परिचारिका यांना मुख्यालय राहण्याचे संबंधित वरिष्ठ व प्रशासनाचे आदेश आहे. परंतु डॉक्टर व परिचारिका यांच्यावर संबंधित वरिष्ठांचा वचक नसल्याने तसेच पाठबळ असल्याने डॉक्टर व परिचारिका मुख्यालयी राहत नसून अपडाऊन करीत आहे. डॉक्टर व परिचारिका वेळेवर उपस्थित नसल्याने रुग्णांना उपचारासाठी तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे.
--------------------
मी प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर आलो असता कोणताही कर्मचारी हजर नव्हते. तसे मी वरिष्ठांना कळविले.
डॉ. परिशे प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र मळसूर
-----------------------------------------
जे कर्मचारी हजर नव्हते त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल.
डॉ. विजय जाधव तालुका वैद्यकीय अधिकारी पातूर