‘कोरोना’च्या काळातही आरोग्य केंद्रातील कर्मचारी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 05:47 PM2020-04-29T17:47:27+5:302020-04-29T17:47:45+5:30
आरोग्य सेवेचा आढावा घेण्यासाठी अकोट, तेल्हारा, अकोला या तीन तालुक्यांतील आरोग्य केंद्रांना भेटी देण्यात आल्या.
अकोला: जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या असता, कर्मचारी अनुपस्थित आढळून आले. त्यांची विनावेतन रजा करण्याची कारवाई जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्याकडून केली जाणार आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यासाठी ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा आढावा घेण्यासाठी अकोट, तेल्हारा, अकोला या तीन तालुक्यांतील आरोग्य केंद्रांना भेटी देण्यात आल्या. या तालुक्यात भेटी देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. तोरणेकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रकाश गवळी उपस्थित होते. यावेळी मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा भिरडे, सावरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश वालसिंगे यांनी केंद्रांतर्गत गावे, कोरोना संदर्भातील कार्यवाहीची संपूर्ण माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष सावित्री राठोड यांनी आशा व आरोग्य कर्मचारी यांना सॅनिटायझर, मास्क इत्यादी प्रतिबंधात्मक साहित्य उपलब्ध आहे की नाही, याची पडताळणी केली. यावेळी काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी अनुपस्थित आढळून आले, त्याची विनावेतन रजा करण्याचेही ठरविण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले पुढील कारवाई करणार आहेत.