कस्तुरबा गांधी रुग्णालयात आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:17 AM2021-05-22T04:17:42+5:302021-05-22T04:17:42+5:30
शहरात दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट अकोला: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कडक निर्बंध लागू केले ...
शहरात दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट
अकोला: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. सकाळी अकरा वाजेपर्यंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याची परवानगी आहे. त्यानंतर दुपारी शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतो. उन्हाच्या तीव्रतेमुळेही नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत.
साहित्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड
अकोला: कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कड़क निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही, ही बाब लक्षात घेता जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी सात ते सकाळी अकरा वाजेपर्यंत नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. या दरम्यानच्या काळात वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. यावेळी कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे कोरोनाच्या प्रसाराची शक्यता बळावली आहे.
पूर्व व दक्षिण झोनमध्ये सर्वे
अकोला: शहरात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. यातही प्रामुख्याने पूर्व व दक्षिण झोनमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. याठिकाणी कोरोना बाधितांची आढळून येणारी संख्या लक्षात घेता प्रशासनाने या दोन्ही झोनमध्ये सर्वे करण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली आहे. मागील काही दिवसांपासून शिक्षक व आशा वर्कर यांच्या वतीने या दोन्ही झोनमध्ये नागरिकांचा आरोग्य सर्वे केला जात आहे.
बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी
अकोला: कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सकाळी सात ते सकाळी अकरा वाजेपर्यंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे. यादरम्यान, शहरातील जुना भाजी बाजार, मोहम्मद अली रोड, टिळक रोड तसेच खुले नाट्यगृह ते फतेह अली चौकापर्यंत साहित्य खरेदीसाठी जमलेल्या नागरिकांमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. यावेळी पोलिसांनी वाहतुकीची कोंडी सोडवली.
विद्युत पुरवठा सुरळीत होईना!
अकोला: शहरात 18 मे रोजी रात्री अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडले. यामध्ये विद्युत खांब वाकले तसेच अनेक ठिकाणच्या विद्युत तारा तुटल्यामुळे शहराच्या विविध भागात अंधार पसरला होता. दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीचा सामना करताना महावितरण कंपनीचे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही भागात अद्यापही विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.