ऑनलाईन वैद्यकीय सल्ल्यासाठी आरोग्य विभागाची ई-संजिवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 11:02 AM2020-05-02T11:02:24+5:302020-05-02T11:02:35+5:30
ऑनलाईन वैद्यकीय सल्ला व औषधोपचार देण्याची सुविधा एका संकेतस्थळाद्वारे नागरीकांना उपलब्ध करून दिली आहे.
अकोला : कोरोना विषाणूला रोखण्याकरीता गर्दी करु नये, अशा सुचना केल्या जात आहेत व त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुद्धा करण्यात येत आहेत. त्या अनुषंगानेच आरोग्य विभागाने लोकांना ऑनलाईन वैद्यकीय सल्ला व औषधोपचार देण्याची सुविधा एका संकेतस्थळाद्वारे नागरीकांना उपलब्ध करून दिली आहे. तसेच आरोग्य सेतू हे मोबाईल अॅप ही प्रचलित आहे.
याबाबत अकोला मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. आर.एस. फारुकी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे राष्ट्रीय दूरसंपर्कसेवेच्या वतीने www.esanjeevaniopd.in ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटवर जाऊन लोकांना वैद्यकीय सल्ला घेता येणे शक्य होणार आहे. सध्या लॉकडाऊन व सामाजिक अतंर ठेवणे आवश्यक असल्याने या वेबसाईटव्दारे घर बसल्या उपचाराची विनामूल्य व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये सबंधित रुग्णाला वेबसाईट वर मोबाईल क्रमांकाव्दारे ओ.टी.पी. प्राप्त करुन उपचार बाबत वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे पुढील कार्यवाही करण्यात येईल.
तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे व जनजागृती करण्याच्या दृष्टीने आरोग्य सेतू अॅप तयार केलेले आहे. गुगल प्ले स्टोअरव्दारे हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन केल्या नंतर त्यामध्ये विविध माहितीचे संकलन केल्यावर कोरोना विषयक माहिती मिळणे शक्य होणार आहे. तसेच या अॅप च्या माध्यमातुन कोवीड आजाराच्या लक्षणांची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. आरोग्य सेतू अॅप कोरोनाबाधितांच्या संर्पकात आल्य नंतर दक्ष (अर्लट) करण्याचेही काम करते. नागरीकांनी कोरोनाशी सुरु असलेल्या युद्धात एकजुटीने सहभागी होवून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे व आॅनलाईन ओपीडी करीता www.esanjeevaniopd.in या वेबसाईटचा उपयोग करावा. तसेच आरोग्य सेतू अॅप प्रत्येक नागरीकाने मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन वापर करावा, असे आवाहन अकोला परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. आर. एस. फारुकी यांनी केले आहे.