साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 05:06 PM2019-06-18T17:06:46+5:302019-06-18T17:06:50+5:30
३१ आॅक्टोबरपर्यंत जिल्हास्तर, तालुकास्तर व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २४ तास साथरोग नियंत्रण कक्ष सुरू राहणार असल्याची माहिती डॉ. वसंत सरनाईक यांनी दिली.
अकोला: पावसाळ््यात साथरोगावर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज झाले असून, ३१ आॅक्टोबरपर्यंत जिल्हास्तर, तालुकास्तर व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २४ तास साथरोग नियंत्रण कक्ष सुरू राहणार असल्याची माहिती डॉ. वसंत सरनाईक यांनी दिली.
पावसाळ््यात साथरोगावर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज झाले असून, सोमवारी हिवताप विभागातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सरनाईक माहिती देताना बोलत होते. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने साथरोग नियंत्रणासाठी कंबर कसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील एकूण ५३५ ग्रामपंचायती तसेच ८२९ गावांमध्ये साथरोग नियंत्रणासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ३१ आॅक्टोबरपर्यंत सर्वोपचार रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आरोग्य उपकेंद्रांमध्ये साथरोग नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून, हे कक्ष २४ तास सेवा पुरविणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसेच १५९ जोखीमग्रस्त, पुराचा धोका नदी काठच्या गावांकडेही विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. साथरोग नियंत्रण कक्षात २१ प्रकारच्या अत्यावश्यक औषधांसोबतच स्वतंत्र किट्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्हास्तरावर एक शीघ्र प्रतिसाद पथक कार्यरत केले असून, जिल्हास्तरावर पाच, तर तालुकास्तरावर सात वैद्यकीय पथके कार्यरत राहणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.