आरोग्य विभागाच्या आदेशाला मलेरिया विभागाचा खो!
By Admin | Published: July 9, 2016 12:58 AM2016-07-09T00:58:43+5:302016-07-09T01:03:52+5:30
जनजागृतीला ठेंगा: आरोग्य धोक्यात.
अकोला: दरवर्षी जुलै महिन्यात डेंग्यूच्या आजारांत वाढ होत असल्याचे पाहून राज्याच्या आरोग्य विभागाने संपूर्ण जुलै महिन्यात नागरिकांच्या घरोघरी जाऊन जनजागृती करण्याचा आदेश हिवताप विभागाला दिला. हा आदेश पायदळी तुडवत महापालिकेच्या हिवताप विभागाने अद्यापही शहरात जनजागृतीसाठी पुढाकार घेतला नसल्याचे चित्र आहे. पालिकेच्या उदासीन भूमिकेमुळे अकोलेकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून प्रशासनाप्रती नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत वाढणारी डासांची संख्या आणि त्यामुळे होणारे डेंग्यूसारखे आजार यावर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने राज्याच्या आरोग्य विभागाने जुलै महिन्यात विशेष मोहीम आखली आहे. राष्ट्रीय कीटकजन्य कार्यक्रमांतर्गत राज्यभरात डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी जुलै महिना हा डेंग्यूप्रतिरोध महिना म्हणून पाळला जाणार आहे.
यामध्ये जनजागृतीसाठी प्रदर्शने, दिंडी, चित्रकला, निबंध स्पर्धा यांचे आयोजन करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. डॉक्टर व नागरिकांसाठी सार्वजनिक कार्यक्रम, पत्रके वाटप अशा स्वरूपाचे कार्यक्रम महिनाभर घेण्याची सूचना आहे. १५ व २५ जुलै हे दिवस नागरिकांनी कोरडे दिवस पाळावेत, असे आवाहनही या अभियानामध्ये करण्यात आले आहे. संपूर्ण जुलै महिन्यात जनजागृती करण्याचे जिल्हा व शहराच्या हिवताप विभागाला आदेश आहेत. या आदेशाला महापालिकेने केराची टोपली दाखवली आहे.