कोरोनाबाधित रुग्णांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांकडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:19 AM2021-03-23T04:19:42+5:302021-03-23T04:19:42+5:30
अकोला : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतरही काही नागरिक घराबाहेर निघत असल्याची बाब ...
अकोला : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतरही काही नागरिक घराबाहेर निघत असल्याची बाब मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यावेळी अशा कोरोनाबाधित रुग्णांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांकडे सोपविण्यात आली आहे.
शहरात दररोज किमान २००पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण होत असल्याचा अहवाल महापालिकेला जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त होत आहे. अर्थात कोरोनाची लागण झाल्यानंतरही काही नागरिक घराबाहेर निघत असल्याची बाब महापालिकेच्या निदर्शनास आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बाजारपेठेत किंवा इतरत्र बिनधास्तपणे फिरत असल्यामुळे कोरोनाच्या प्रसाराला हातभार लागत आहे. एकूणच परिस्थिती लक्षात घेता कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल प्राप्त होताच मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेकडून तो तातडीने संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे सादर केला जात आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या स्तरावरून कोरोनाबाधित रुग्णांची माहिती त्या-त्या प्रभागातील आरोग्य निरीक्षकांकडे दिली जात आहे. आरोग्य निरीक्षकांनी संबंधित कोरोनाबाधित रुग्णाच्या घरी जाऊन त्याची माहिती घेणे तसेच तो रुग्ण घराबाहेर निघणार नाही याची सूचना देण्याचे काम आरोग्य निरीक्षकांवर सोपविण्यात आले आहे. पुढील दहा ते बारा दिवस कोरोनाबाधित व्यक्ती घराबाहेर निघणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश आरोग्य निरीक्षकांना देण्यात आले आहेत. यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा बसेल अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.
रुग्णालयांमध्ये खाटांचा अभाव
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे या सर्व बाबींचा ताण जिल्हा सामान्य रुग्णालयासह शहरातील खासगी रुग्णालयांवर येत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता निर्माण झाली असून, रुग्णांवर जमिनीवर उपचार करण्याची वेळ ओढवली आहे.
सर्वेक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ध्यानात घेता मनपा प्रशासनाने अकोलेकरांच्या आरोग्य तपासणीसाठी मोहीम सुरू केली. यामध्ये मनपाचे शिक्षक तसेच आशा वर्कर यांचा समावेश असून मालमत्ता कर विभागातील करवसुली निरीक्षकांच्या माध्यमातून सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.