अकोला जिल्ह्यात २.२८ लाख कुटुंबांचे आरोग्य सर्वेक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2020 09:51 AM2020-11-01T09:51:40+5:302020-11-01T09:54:08+5:30
Akola News दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी आदी दुर्धर आजाराच्या व्यक्ती, संदिग्ध कोविड रुग्ण, कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची माहिती नोंदविण्यात आली.
अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी ‘माझे कुुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत २४ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात २ लाख २८ हजार कुटुंबांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले.
कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासह रुग्णसंख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनामार्फत राबिवण्यात येत असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात १४ ते २४ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात आली. आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका इत्यादींचा समावेश असलेल्या आरोग्य पथकांकडून गृहभेटीव्दारे जिल्ह्यातील ८३६ गावांमध्ये २ लाख २८ हजार कुटुंबांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी आदी दुर्धर आजाराच्या व्यक्ती, संदिग्ध कोविड रुग्ण, कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची माहिती नोंदविण्यात आली.
२०,८५२ व्यक्ती दुर्धर आजारग्रस्त !
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात २ लाख २८ हजार कुटुंबांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये २० हजार ८५२ व्यक्ती दुर्धर आजारग्रस्त आढळून आले. त्यात दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी, हृदयविकार आदी आजारग्रस्त व्यक्तींचा समावेश आहे.
कोरोना संदिग्ध ४०२ रुग्ण आढळले !
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील आरोग्य सर्वेक्षणात जिल्ह्यात कोरोना संदिग्ध ४०२ रुग्ण आढळून आले. त्यापैकी १७१ संदिग्ध रुग्णांना कोविड केअर सेंटरला हलविण्यात (रेफर) आले.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी ‘मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात १४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत २ लाख २८ हजार कुटुंबांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये २० हजार ८५२ दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती आढळून आले असून, कोविड संदिग्ध ४०२ रुग्ण आढळून आले.
- डाॅ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.