आगर गावातील आरोग्य यंत्रणाच आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:13 AM2021-02-05T06:13:35+5:302021-02-05T06:13:35+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर सापडली आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हा ...
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर सापडली आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हा परिषद विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
आगरसह जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रे व वैद्यकीय अधिकारी, इतर कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था केली असून, त्यांना दरमहा निवासासाठी खर्च केली जाणारी रक्कमसुद्धा त्यांच्या पगारात दिली जाते; परंतु वैद्यकीय अधिकारी निवासात राहत नाहीत. रात्री-बेरात्री रुग्णांना काही त्रास झाला तर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी जागेवर सापडत नाहीत. त्यामुळे रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचार घ्यावा लागत आहे. या गंभीर बाबीकडे संबंधित जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी निवासस्थानांमध्ये राहत नसल्यामुळे आरोग्य केंद्राची इमारत केवळ शोभेची वास्तू बनली आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी घरी राहूनच कारभार पाहत असल्यामुळे ग्रामीण जनतेच्या आरोग्यासोबत खेळ होत आहे.
फोटो:
आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. याबाबत तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे लेखी आदेश जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले आहेत.
सावित्रीबाई हिरासिंग राठोड, आरोग्य सभापती, जिल्हा परिषद
प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण दोन वैद्यकीय अधिकारी पदे आहेत; परंतु यामध्ये एक पद रिक्त असल्यामुळे कार्यभार माझ्याकडे आहे. दिवस-रात्र मी एकटाच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्यामुळे आरोग्य केंद्राची जबाबदारी सांभाळणे कठीण होत आहे. शासनाने दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.
डॉ. अजय नाथक, वैद्यकीय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र, आगर.
आरोग्य केंद्रातील कर्मचारी अप-डाऊन करीत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर परिणाम झाला आहे. आरोग्य केंद्रात उपलब्ध सुविधा मिळत नसल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी जावे लागत आहे. हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
वेणूताई डाबेराव, जि. प. सदस्य, आगर.
उपचारासाठी आरोग्य केंद्रात गेलो असता वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता. साहेब सुटीवर असल्याचे सांगण्यात आले.
अमोल भागवत, ग्रामस्थ, आगर.