ज्येष्ठांच्या लसीकरणाबाबत आरोग्य यंत्रणाच संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 10:21 AM2021-03-01T10:21:34+5:302021-03-01T10:21:54+5:30
CoronaVaccine नोंदणी कशी करावी, कोणते लसीकरण केंद्र असणार, याबाबत आरोग्य यंत्रणाच संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.
अकोला: कोविड लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. मात्र, ही लसीकरण मोहीम नेमकी कशी राबवावी, त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी कशी करावी, कोणते लसीकरण केंद्र असणार, याबाबत आरोग्य यंत्रणाच संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.
देशभरात १ मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, तसेच ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे. त्या अनुषंगाने राज्यभरात तायरी सुरू झाली आहे. लस घेण्यापूर्वी नोंदणी करणे आवश्यक असून, त्यासाठी कोविन २.० हे ॲप उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. मात्र, हे कोविन ॲप बंद असल्याने रविवारी सायंकाळपर्यंत एकाचीही नोंदणी होऊ शकली नाही, शिवाय ज्येष्ठांची लसीकरण मोहीम कशी राबवावी, याबाबत खुद्द आरोग्य यंत्रणाच संभ्रमात असल्याचे दिसून आले. ज्येष्ठांना कुठे लसीकरण करण्यात येईल, याबाबतही आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना निश्चित सांगता आले नाही. त्यामुळे सोमवारी जिल्ह्यात ज्येष्ठांना लस मिळणारच हे अद्यापही निश्चित झाले नाही.
१३ केंद्रांची नावे सुचविली
ज्येष्ठांच्या कोविड लसीकरण मोहीमेसाठी जिल्ह्यातील १३ रुग्णालयांची नावे केंद्र म्हणून केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले होते. यापैकी ज्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत, अशाच रुग्णालयांना लसीकरण केंद्र म्हणून मान्यता दिली जाणार आहे. स्थानिक आरोग्य केंद्राला केंद्र निश्चित झाल्याची माहिती प्राप्त झाली नसल्याचेही आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
...तर १ मार्चला प्रायोगिक तत्त्वावर होईल लसीकरण
शनिवार, रविवार असे दोन दिवस कोविन ॲप बंद होते. त्यामुळे ज्येष्ठांना लसीसाठी नोंदणी करणे शक्य झाले नाही. हे ॲप सोमवारी सुरू झाल्यास प्रायोगिक तत्त्वावर काही ज्येष्ठांची नोंदणी करून त्यांना लस दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर, पुढील दोन ते तीन दिवसांनंतर जिल्ह्यातील ज्येष्ठांना लस देण्यास सुरुवात होऊ शकते. सध्या तरी योग्य नियोजनाअभावी आणि वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शक सूचना मिळाल्या नसल्याने संभ्रमाची स्थिती आहे.
अशी करता येईल नोंदणी
कोविन २.० या लिंकवर जाऊन नोंदणी करता येईल.
एका मोबाइल क्रमांकावरून चौघांना नोंदणी करणे शक्य आहे.
४५ ते ५९ वर्षे वयोगटांतील व्यक्तींना आजार असेल, तर तसे प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.
आधार कार्डची नोंदणी आवश्यक असेल.
वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शक सूचना मिळाल्या नाहीत. सोमवारी कोविन लिंक सुरू झाल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर ज्येष्ठांची नोंदणी व लसीकरण मोहीम सुरू करू. जिल्ह्यातील समितीला लसीकरण केंद्रासाठी १३ रुग्णालयांची नावे पाठविण्यात आली होती. यापैकी केंद्र म्हणून मान्यता मिळालेल्या रुग्णालयात वरिष्ठांच्या सूचनेनुसार लसीकरण सुरू केले जाईल.
- डॉ.मनिष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला
ही आहेत लसीकरण केंद्र
- शुक्ला चिल्ड्रेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल - गंगाधर प्लॉट, स्टेशन रोड
- न्यू ग्लोबल हॉस्पिटल ॲन्ड क्रिटिकल केअर सेंटर - अमनखाँ प्लॉट, सिव्हिल लाईन्स रोड, अकोला
- सीटी हॉस्पिटल - नेत्र हॉस्पिटलजवळ रामदासपेठ
- माउली मॅटर्निटी ॲन्ड सर्जिकल सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल - भागवत वार्ड, श्रमदान मार्ग, अकोला
- डॉ. के. एस. पाटील हॉस्पिटल ॲन्ड पॉलिक्लिनिक -
- श्रीमती बी. एल. चांडक रिसर्च फाउंडेशन (किडनी डायलिसिस युनिट) -
- संत तुकाराम हॉस्पिटल ॲन्ड मेडिकल रिसर्च सेंटर - गौरक्षण रोड, तुकाराम चौक
- विठ्ठल हॉस्पिटल - केडिया प्लॉट, जठारपेठ
- मुरारका हॉस्पिटल - दुर्गा चौक, जठारपेठ
- मेहरे ऑर्थोपेडिक हॉस्पिटल -
- बबन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल -
- अवघाटे बाल रुग्णालय ॲन्ड मल्टिस्पेशालिटी सेंटर - मुर्तिजापूर
- रिलायन्स हॉस्पिटल (युनिट ऑफ मांडके फाउंडेशन) - बाळापूर रोड