जिल्हा स्त्री रुग्णालयात २६५ प्रशिक्षणार्थींना दिले जातेय आरोग्य प्रशिक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:23 AM2021-08-24T04:23:21+5:302021-08-24T04:23:21+5:30
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ मिळावे. याशिवाय शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये कौशल्यपूर्ण मनुष्यबळ मिळावे या उद्देशाने जिल्ह्यात ...
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ मिळावे. याशिवाय शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये कौशल्यपूर्ण मनुष्यबळ मिळावे या उद्देशाने जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शहरातील तीन खासगी रुग्णालयात प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहेत. याअंतर्गत सोमवारी जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन व ॲप्रॉन वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कौशल्य विकास अधिकारी निशिकांत पोफळी, ओएस कविता बुंदे, प्रशासकीय अधिकारी डॉ. राधा जोगी, प्रशिक्षक डॉ. जगदीश खंडेतोड, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक सुनीता गोळे, कौशल्य विकास समन्वयक चेतना काळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. रुग्णालयात रुग्ण आल्यानंतर त्याची मदत करणे, त्याच्याशी संवाद साधण्यासाठी मराठी आणि हिंदी भाषेची जाण असणे, साधा पोशाख असणे आदी विविध बाबींचे महत्त्व मान्यवरांनी यावेळी पटवून सांगितले.
संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी
जिल्ह्यात कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. या काळात कुशल मनुष्यबळाची मोठी कमी दिसून आली. त्याचा फटका रुग्णसेवेलाही बसला. दुसरी लाट ओसरत नाही, तोच तिसऱ्या लाटेचा इशारा देखील दिला जात आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, आरोग्य विभागामार्फत प्रशिक्षणाच्या माध्यमातून पूर्वतयारी केली जात आहे. सद्यस्थितीत जिल्हा स्त्री रुग्णालय येथे ९ अभ्यासक्रमाच्या माध्यमातून २६५ प्रशिक्षणार्थींना आरोग्य विषयक प्रशिक्षण दिले जात आहे.