कर्मचार्यांअभावी आरोग्य उपकेंद्र वार्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:26 AM2017-11-20T01:26:48+5:302017-11-20T01:32:28+5:30
माळेगाव बाजार : दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या माळेगाव बाजार येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेविकेचे पद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असून, उपकेंद्र नेहमी बंद राहत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
माळेगाव बाजार : दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या माळेगाव बाजार येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेविकेचे पद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असून, उपकेंद्र नेहमी बंद राहत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. वरिष्ठ अधिकार्यांचे मात्र या बाबीकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.
या उपकेंद्रात आरोग्यसेविका नवृत्त झाल्यापासून हे रिक्त पद न भरल्यामुळे गावात आरोग्याच्या सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. यामुळे आरोग्य सेवेबद्दल ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. १0 हजार लोकवस्तीच्या गावात अद्यापही आरोग्य उपकेंद्राची इमारत बनलेली नाही. जुन्या चावडीत सदर दवाखाना आहे. या उपकेंद्रामध्ये आरोग्यसेविका, आरोग्यसेवक व कंत्राटी आरोग्यसेविका असे तीन कर्मचारी कार्यरत असून, याआधी आरोग्यसेविका वगळता इतर दोन कर्मचारी मुख्यालयी तर राहतच नाहीत; मात्र आरोग्यसेवकाचे साप्ताहिक दर्शनही होत नाही. याविषयी आरोग्यसेविकेचे महत्त्वाचे रिक्त पद भरून रुग्णांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी होत आहे.
गावात विविध आजारांमध्ये वाढ
गावात येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सुविधा नसल्यामुळे आरोग्यसेवा विस्कळीत झाली आहे. आरोग्य उपकेंद्र परिसरात मोकाट जनावरांचा संचार असतो. आजूबाजूने सर्वत्र घाण पसरल्याने अस्वच्छता या ठिकाणी निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे विविध आजारांमध्ये वाढ झाली असून, आरोग्यसेविकेचे पद रिक्त असल्यामुळे गरज गरीब नागरिक, गरीब शेतकरी या ठिकाणी गोळ्या व औषधाकरिता येत असतात; मात्र आरोग्यसेविका नसल्याने त्यांना परत जावे लागत आहे. या बाबीकडे संबंधित अधिकारी व पदाधिकार्यांचे दुर्लक्ष असल्याने पद रिक्त आहे. येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेविकेची त्वरित नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र दानापूर अंतर्गत येणार्या माळेगाव बाजार या उपकेद्रातील आरोग्यसेवक व सेविकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त जागांविषयी जि.प.च्या आरोग्य विभागाला माहिती सादर केली आहे. रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार आहेत.
-डॉ.एस.जी.बोडखे, वैद्यकीय अधिकारी,दानापूर