योजनांमध्ये मागे असलेल्या ग्रामसेवकांची सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:59 AM2019-07-15T10:59:51+5:302019-07-15T11:00:24+5:30
३१ जुलैपर्यंत ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने शेवटच्या पाच ग्रामसेवकांची मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमक्ष सुनावणीत झाडाझडती घेतली जाणार आहे.
अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात कुचराई करणाऱ्या ग्रामसेवकांची ३ आॅगस्ट रोजी सुनावणी घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. ३१ जुलैपर्यंत ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने शेवटच्या पाच ग्रामसेवकांची मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमक्ष सुनावणीत झाडाझडती घेतली जाणार आहे.
जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत स्तरावर विविध योजना राबविण्यासाठीचे उद्दिष्ट तसेच कालमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्यापैकी तीन योजनांची कालमर्यादा ३१ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्या उद्दिष्टापैकी सर्वात कमी साध्य असलेल्या पाच ग्रामसेवकांची थेट मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. ३ आॅगस्ट रोजी संबंधित ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेत उपस्थित राहावे लागणार आहे. सुनावणीमध्ये प्रशासकीय कारवाईस पात्र ठरणाºया ग्रामसेवकांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे, असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांना दिले आहे.
- योजनांचा पाठपुरावा
ग्रामसेवकांनी ३१ जुलैपर्यंत उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी तीन योजना ठरवून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामांची अंमलबजावणी करण्याचे विषय आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी राबविलेल्या योजनांचा आढावा घेऊन सर्वात मागे असलेल्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.