सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी?
By admin | Published: December 16, 2014 12:53 AM2014-12-16T00:53:44+5:302014-12-16T00:53:44+5:30
अकोला मनपा स्थायी समिती सदस्य निवड प्रकरण.
अकोला : मनपातील स्थायी समिती सदस्यांच्या निवडप्रक्रियेच्या प्रकरणाची मंगळवार, १६ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. आजवर दोन्ही पक्षांच्यावतीने बाजू मांडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने यासंदर्भात न्यायालय अंतिम निकाल देते की सुनावणी पुढे ढकलली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महानगरपालिकेत २0 मार्च २0१२ रोजी १६ सदस्यीय स्थायी समितीचे गठण करण्यात आले होते. निवड झालेल्या स्थायी समिती सभापतीचा कार्यकाळ एक वर्षाचा होता. एक वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या आठ सदस्यांना ईश्वरचिठ्ठीद्वारे नवृत्त व्हावे लागले. नव्याने आठ सदस्यांची निवड प्रक्रिया मनपाच्या विशेष सभेत पार पडली. यानंतर सभेत तत्कालीन महापौर ज्योत्स्ना गवई यांनी घेतलेल्या मतदान प्रक्रियेवर आक्षेप नोंदवत, भाजपप्रणीत महानगर सुधार समितीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. यावर सुनावणी झाली असता, सभागृहातील निवडप्रक्रिया न्यायालयाने रद्द करीत नव्याने आठ सदस्यांची निवड करण्याचे आदेश तत्कालीन महापौर व आयुक्तांना दिले. तथापि, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता, काँग्रेसप्रणीत अकोला विकास आघाडीच्यावतीने काँग्रेस नगरसेवक साजिद खान व राकाँ गटनेता अजय रामटेके यांनी नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी होणार आहे. यावेळी न्यायालय निकाल जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.