अकोल्यात मॉन्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 07:18 PM2021-06-06T19:18:32+5:302021-06-06T19:22:23+5:30
Heavy pre-monsoon rains in Akola : शेतकरी मान्सूनची वाट पाहत असताना रविवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली.
अकोला : मान्सूनची जोराने वाटचाल सुरू असून जिल्ह्यातही लवकरच दाखल होणार आहे. शेतकरी मान्सूनची वाट पाहत असताना रविवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अर्धा तास झालेल्या वादळी पावसामुळे सर्वत्र दानादान उडाली. शहरातील उमरी, सिव्हील लाईन ते जवाहर नगर या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.खरीप हंगामासाठी बळीराजा सज्ज झाला आहे. जिल्ह्यात केवळ मान्सूनची दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. त्यापूर्वी ७ ते ८ दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावत आहे.
दररोज जिल्ह्यातील एखाद्या भागात तुरळक पाऊस बरसत आहे. गेल्या रविवारी शहरात झालेल्या पावसामुळे चांगलाच तडाखा बसला होता. यामध्ये अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती तर दुकाने व घरांवरील पत्रे उडाली होती. तसेच पिकांचेही नुकसान झाले होते. या रविवारीही तोच अनुभव अकोलेकरांना आला. दुपारी ३.३५ पासून शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उमरी, सिव्हील लाईन ते जवाहर नगर या रस्त्यांवर पाणी वाहू लागले होते. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे.