भरघोस उत्पादन देणार्या तेलबियाण्यांची देशात भरमार!
By admin | Published: June 29, 2014 12:40 AM2014-06-29T00:40:29+5:302014-06-29T00:51:56+5:30
भरघोस उत्पादन देणारे तेलबियांचे सात वाण विकसित केले आहेत. देशात असेच अनेक वाण आहेत;
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणारे तेलबियांचे सात वाण विकसित केले आहेत. देशात असेच अनेक वाण आहेत; परंतु किफायतशीर भाव मिळत नसल्याने राज्यातील तेलबिया क्षेत्र व उत्पादन घटले आहे.दरम्यान, केंद्र शासनाने नुकताच साखर आयातीवर ४0 टक्के कर वाढविला आहे. परंतु रिफाईंड खाद्यतेलाच्या आयातीवर केवळ १0 टक्केच आयात कर लावल्याने बाहेरील तेलाची आवक वाढतच आहे. त्यामुळे देशातील तेलबिया वाणाचे भाव पडले असून, त्याचा फटका शेतकर्यांना सोसावा लागत आहे.
देशातील खाद्यतेलाची गरज भागविण्याकरिता सरकारला विदेशातून खाद्यतेलाची आयात करावी लागत आहे. जवळपास १0२ लाख टनांपेक्षा अधिक ही आयात केली जाते.यात सर्वाधिक पामतेलाचा भरणा असतो.गतवर्षी सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवर १0 टक्के कर आकारला होता.असे असले तरी खाद्य तेलाच्या आयातीत वाढ झाली आहे. भारतातील तेलबिया वाणाला बाजारभावच नसल्यामुळे शेतकर्यांनी तेलबिया वाणाची पेरणी कमी केली आहे.
यावर्षी भुईमुगाला किमान चार हजार रुपये क्विंटल भाव अपेक्षित होता; परंतु हे भाव २७00 ते ३000 रु पये प्रतिक्विंटल खाली घसरले,सोयाबीनचे भावदेखील ३५00 रुपये प्रतिक्विंटलच्या खाली आले. या दरात उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याने शेतकर्यांनी तेलबियाचा पेरा कमी केला आहे.
विदर्भातील तेलबिया पिकाचा विचार केल्यास सूर्यफुलाचे क्षेत्र १ लाख २५ हजार हेक्टर होते. ते घसरू न ८ हजार हेक्टरवर आले आहे. करडीचे क्षेत्र ८0 हजार हेक्टर होते. तेदेखील १५ हेक्टर खाली आले आहे. खरिपाचा भुईमूग दोन लाख हेक्टरहून झपाट्याने खाली घसरत ६ हजार हेक्टरवर आला आहे. उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र ३५ हजार हेक्टर असले तरी हे क्षेत्रदेखील कमी होत चालले आहे.यावर्षी सोयाबीनचा पेरा घटण्याची शक्यता आहे.
जगात भारत हा खाद्यतेलाचा प्रमुख आयातदार आहे. या आयातीवर १0 टक्के आयात कर लावल्याने आयात कमी होऊन त्याचा फायदा यावर्षी शेतकर्यांना होईल, अशी अपेक्षा तेलबिया शास्त्रज्ञांना होती; परंतु भाव पडल्याने यावर्षीदेखील तेलबियाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कमीच आहे.