अकोटात जोरदार पाऊस, रस्त्यांवर साचला चिखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:24 AM2021-06-09T04:24:11+5:302021-06-09T04:24:11+5:30
अकोट : अकोट शहरात व तालुक्यात सोमवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बाजारपेठेत दाणादाण उडाली. या पावसामुळे रस्त्यावर चिखल ...
अकोट : अकोट शहरात व तालुक्यात सोमवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बाजारपेठेत दाणादाण उडाली. या पावसामुळे रस्त्यावर चिखल साचला. विशेष म्हणजे, खानापूर वेसकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम रखडल्यामुळे येथील वस्तीत व रस्त्यावर पाणी तुंबले होते.
या वर्षी जोरदार पाऊस होण्याचे संकेत असल्याने प्रशासनाने पूर्वतयारी करणे आवश्यक होते, परंतु शहरात पाणी तुंबत असलेल्या ठिकाणी असलेली कामे करून घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, शिवाय रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती साचलेली असल्याने, चिखल निर्माण झाल्याने वाहने घसरले. सोमवारी ४ वाजता बाजारपेठ बंद होण्याच्या मार्गावर असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे बाजारपेठेत व्यापारी व ग्राहकांची दाणादाण उडाली. विशेष म्हणजे, या पावसाने अकोला नाका ते खानापूर वेसपर्यंत असलेल्या रस्त्याचे पितळ उघडे पाडले. प्रारंभीपासूनच नित्कृष्ट बांधकामाचा ठपका असलेल्या या रस्त्याचे दोन टप्पे पाडण्यात आले होते, परंतु रस्ता मोजणीत गफलत झाल्याने, दलित वस्तीतील हा रस्ता पूर्ण बांधल्या गेला नाही.
पावसाने वाहनचालकांचे हाल
पावसाळ्यातील पाण्याने या ठिकाणी राहणाऱ्यांचे चांगलेच हाल केले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, तर काही घरात पाणी उंबरठ्यापर्यंत पोहोचले होते. या अर्धवट रस्त्याच्या बांधकाम करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला अनेक महिन्यांपासून देण्यात आले आहेत, परंतु हा रस्ता बांधण्यास सुरुवात झाली नाही. अखेर या भागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. पहिल्या टप्प्यात केलेल्या रस्ता बांधकामाचे नगरपालिकेने संपूर्ण देयक अदा केले. मात्र, या रस्त्यावर माती साचलेली असल्याने अनेक वाहने घसरली. स्थानिक नागरिकांनी स्वत: रस्त्यावरची माती बाजूला केली. दरम्यान, या रस्त्याचे बांधकाम त्वरित न केल्यास वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष अक्षय तेलगोटे यांनी आंदोलन करण्याचा इशाराला दिला आहे.
फोटो: