जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2017 02:48 AM2017-06-08T02:48:34+5:302017-06-08T02:48:34+5:30

काही गावांतील वीज पुरवठा खंडित

Heavy rain with thundershowers in the district | जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात ७ जून रोजी काही ठिकाणी सायंकाळी तर काही ठिकाणी रात्री जोरदार पाऊस पडला. पावसाने मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली. यामुळे काही गावांतील विद्युत पुरवठा खंडित झाला.
जिल्ह्यात अकोला शहरात बुधवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्रीदेखील पाऊस सुरूच होता. तालुक्यातील बोरगाव मंजू परिसरात दुपारी ऊन पडले होते. अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारे व मेघगर्जनेसह रात्री जोरदार पाऊस पडला, त्यामुळे तेथील वीज पुरवठा खंडित झाला. मंगळवारीदेखील बोरगाव मंजू येथे पावसाने हजेरी लावल्याने रात्रभर विद्युत पुरवठा खंडित होता. बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे येथे जोरदार पाऊस पडला. तेथे मागील दोन दिवसांपासून पाऊस येत आहे. आज पाऊस येण्याचा तिसरा दिवस होता, तसेच तालुक्यातील हातरुण, मालवाडा, बोरगाव वैराळे, धामणा, शिगोली, निमकर्दा, कंचनपूर परिसरातदेखील पाऊस झाला. तेल्हारा तालुक्यातील सौंदळा येथे रात्री जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये पावसाच्या दमदार आगमनाबाबत आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मृग नक्षत्रावर पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, बियाणे, खते खरेदी करण्याची लगबग वाढणार आहे.

बोरगाव वैराळे, सोनाळा परिसरात चार दिवसांपासून विजेचा लपंडाव
बोरगाव वैराळे : परिसरात गत चार दिवसांपासून वीज गायब राहते. त्यामुळे पाणीपुरवठ्यासह मजुरांचे दळणाचे वांधे झाले आहेत. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आपले मोबाइल बंद करून ठेवतात. लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे.बोरगाव वैराळे, सोनाळा गावाला गायगाव उपकेंद्रावरून वीज पुरवठा करण्यात येतो. हातरुण फिडरवर अनेक गावे असल्यामुळे एका गावात थोडाही फॉल्ट झाला तर संपूर्ण गावाची वीज बंद करण्यात येते. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असल्याने रात्री वीज असणे आवश्यक आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

नागरिकांवर अंधारात राहण्याची वेळ
गायगाव वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या हातरुण येथील वीज पुरवठा पाऊस सुरू झाल्याबरोबर खंडित झाला, त्यामुळे नागरिकांवर अंधारात राहण्याची वेळ आली. वारंवार बिघाड होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. गायगाव वीज उपकेंद्राने कारभारात सुधारणा करण्याची मागणी माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी केली आहे.

Web Title: Heavy rain with thundershowers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.