जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा येथे वीज पडून बैल ठार
By रवी दामोदर | Published: July 4, 2023 05:55 PM2023-07-04T17:55:29+5:302023-07-04T17:56:25+5:30
बाळापूर, पातूर, अकोला तालुक्यात काही भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अकोला - जिल्ह्यात मंगळवार रोजी काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे चातकाप्रमाणे प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसाने अंकुरलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. दुसरीकडे, बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा येथे वीज पडून बैल ठार झाल्याची घटना समोर आली आहे.
जिल्ह्यात बाळापूर, पातूर, अकोला तालुक्यात काही भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग येणार आहे. उडीद, मुगाच्या पेरणीची वेळ गेल्याने आता शेतकऱ्यांचा तूर, सोयाबीन व कपाशी पिकाकडे दिसून येत आहे. त्यामुळे सोयाबीन व कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. गत काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतित होता. अखेर मंगळवारी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
नया अंदुरा येथे शेतकऱ्यावर संकट
बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा येथे वीज अंगावर पडल्याने एक बैल ठार, तर दुसरा बैल गंभीर जखमी झाला. शेतातील पेरणीची कामे करून शेतकरी रामा सुखदेव मांगुळकार हे घरी परतत होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. रामा मांगुळकार यांनी जोरदार पाऊस सुरू होताच बैल जोडी घरासमोर बांधून ठेवली. अचानक बैलांच्या अंगावर वीज पडल्याने एक बैल घटनास्थळीच ठार झाला, तर दुसरा बैल गंभीर जखमी झाला.
बैल दगावल्याने व दुसरा बैल गंभीर जखमी झाल्याने शेतकऱ्यावर संकट कोसळले असून, पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकरी रामा मांगुळकार यांच्यासमोर उभा राहिला आहे. शेतकऱ्याला नुकसान भरपाई तत्काळ मिळावी, अशी मागणी होत आहे. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डाबेराव, तलाठी सतीश कराड यांनी पंचनामा केला आहे.