अकोल्यात संततधार पाऊस;  नदी, नाल्यांना पूर,  पिके पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 01:59 PM2019-08-09T13:59:11+5:302019-08-09T14:02:31+5:30

धरणक्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने वारी हनुमान सागर धरणाचे सहा दरवाजे ५० सेंमी.ने उघडण्यात आले आहेत.

Heavy rains in Akola; River, flood to rivers, crops under water | अकोल्यात संततधार पाऊस;  नदी, नाल्यांना पूर,  पिके पाण्याखाली

अकोल्यात संततधार पाऊस;  नदी, नाल्यांना पूर,  पिके पाण्याखाली

Next


अकोला : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका अकोट आणि तेल्हारा तालुक्याला बसला आहे. दोन्ही तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. वारी हनुमान सागर धरणात जलसाठा वाढल्याने सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत, तसेच वान नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात ७ आॅगस्टपासून संंततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आले आहेत. अनेक मार्गावर पुलावरून पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने वारी हनुमान सागर धरणाचे सहा दरवाजे ५० सेंमी.ने उघडण्यात आले आहेत. वान नदी पात्रामध्ये सहा हजार क्यूसेकनी पाणी सोडण्यात येत आहे. तेल्हारा तालुक्यातील मुख्य नद्या पूर्णा, आस, विद्रुपा, गौतमा, बगडा, लेंडी व सातपुडा पर्वत रांगेतून वाहणारे लहान-मोठ्या नदीनाल्यांना पूर आला आहे. पुलावरून पाणी असल्याने मुख्य वाहतुकीचे तेल्हारा, मुंडगाव,अकोट, हिवरखेड, अकोट, बेलखेड, अकोली सिरसोली,अकोट, मनब्दा, अकोला, तेल्हारा, वरवट या रस्त्यांवरील एसटी बस व इतर वाहतूक बंद होती, तसेच वरूड भोकर, काळेगाव, मनब्दा, अटकही गावांना पुराचा वेढा असल्याने संपर्क तुटला होता.

अकोल्यात २६.६ मि. मी.पाऊस
४जिल्ह्यात गुरुवार, सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत अकोला येथे २६.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मागील चोवीस तासांत गुरुवार सकाळी ८.३० वाजतापर्यंत अकोला जिल्ह्यातील अकोट येथे सर्वाधिक ६० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तेल्हारा तालुक्यात ४० मिमी, मूर्र्तिजापूर ३० मिमी, बार्शीटाकळी व पातूर २० मिमी पाऊस झाला.


‘वान’चे सहा तर ‘पोपटखेड’चे दोन वक्रद्वार उघडले!
सौंदळा : वानच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. जलसाठ्यात वाढ होत असल्याने धरणाचे सहा दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले. वान धरणात ७७.५४ टक्के जलसाठा होता. धरणातील जलसाठा वाढल्याने सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
८ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजतापर्यंत एकूण ७६८ मिमी पावसाची नोंद झाली. पाऊस झाला असून, ७ आॅगस्ट रोजीचा पाऊस ४० मिमी झाला आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजता वानच्या हनुमान सागरात ५६ टक्के पाणी होते. ११ वाजतापर्यंत त्यामध्ये ११ टक्क्यांनी वाढ होऊन ६८ टक्के पाणी झाले होते. दुपारी ३ वाजता ७४.३२ टक्के जलसाठा झाला होता.
धरणात पाण्याची आवक पाहता धरणाचे कार्यकारी अभियंते गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात दुपारी ३ वाजता १ आणि ६ नंबरचे दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले. यातून ६००० क्युसेस विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत होता. मागील वर्षी याच परिसरात संपूर्ण पावसाळ्यात ३७६ मिमी पाऊस झाला होता. नदी-नाल्यांसोबत वान प्रकल्पही तुडुंब भरले आहे. पोपटखेड धरणात जलसाठा वाढण्याची शक्यता असल्याने दोन वक्रद्वार उघडण्यात आले.

२७ मजुरांची सुटका
अकोट तालुक्यातील देवरी गावानजिक फॉरेस्टमधील रोपवनाच्या कामासाठी आलेल्या २७-३० कोरकु मजूर चंद्रीका नदी आणि चिखल रोड नाल्याला पूर आल्यामुळे नदी आणि नाल्याच्या दोन्ही साईटच्यामध्ये अडकले आहेत. या मजुरांना अकोटला जाण्यासाठी मार्ग नाही. जर रात्री पुराचे पाणी वाढले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. यासाठी फॉरेस्टचे आर.ओ.बावने यांनी संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तत्काळ या मजुरांची सुटका करून घेण्यासाठी पाचारण केले. बचाव पथक तातडीने मजुरांना पुरातून काढण्यात यश प्राप्त झाले.

Web Title: Heavy rains in Akola; River, flood to rivers, crops under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.