जिल्ह्यात धो-धो पाऊस; नदी-नाल्यांना पूर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:24 AM2021-09-08T04:24:15+5:302021-09-08T04:24:15+5:30
अकोला : जिल्ह्यात सोमवारी रात्री धो-धो पाऊस बरसल्याने मंगळवारी जिल्ह्यातील विविध भागांत नदी-नाल्यांना पूर आला. त्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यासह जिल्ह्यातील ...
अकोला : जिल्ह्यात सोमवारी रात्री धो-धो पाऊस बरसल्याने मंगळवारी जिल्ह्यातील विविध भागांत नदी-नाल्यांना पूर आला. त्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यासह जिल्ह्यातील ९ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टी व पुरामुळे शेतीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि पोळा सण साजरा होत असताना ६ सप्टेंबर रोजी रात्री आणि मंगळवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. गेल्या चोवीस तासांत मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५०.८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यासह ९ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. धो-धो बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून, अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात शेतजमिनीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवार, ७ सप्टेंबर रोजीदेखील दिवसभर पाऊस सुरूच होता.
गेल्या २४ तासांत तालुकानिहाय असा झाला पाऊस !
तालुका पाऊस (मि.मी.)
अकोट ३९.५
तेल्हारा १६.३
बाळापूर ५६.५
अकोला ५०.२
बार्शीटाकळी ६०.९
मूर्तिजापूर ८१.९
...............................................
एकूण सरासरी ५०.८
पुलावरून पाणी; वाहतूक विस्कळीत !
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर आला असून, गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पुलासह विविध ठिकाणी पुलांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने मंगळवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली.