मुसळधार पावसाचा महावितरणला फटका, अनेक गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:17 AM2021-07-25T04:17:00+5:302021-07-25T04:17:00+5:30
विदर्भासह राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील मोर्णा व पुर्णा नदीकाठची गावे पाण्यात गेली आहेत. पुराच्या पाण्याचा वेग एवढा प्रचंड ...
विदर्भासह राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील मोर्णा व पुर्णा नदीकाठची गावे पाण्यात गेली आहेत. पुराच्या पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की, या पुरात मोर्णा नदीच्या काठालगतचे १५ उच्चदाब वाहिनीचे तर २ लघुदाब वाहिनीचे वीज खांब आणि त्यावरील वीजवाहिन्या वाहून गेल्या आहेत. उच्च व लघुदाब वाहिनीचे १७५ वीज खांब जमीनदोस्त झाले आहेत. ६१ वीज खांब तुटले आहेत तर २८१ वीज खांब जमिनीलगत झुकले आहेत. याचबरोबर १० वितरण रोहित्रे पडल्याने मोर्णा आणि पुर्णा नदी परिसरातील २४ गावे अंधारात गेली होती.
या गावांचा विद्युत पुरवठा पूर्ववत
अशा परिस्थितीतही महावितरणने आपल्या कर्मचाऱ्यांसह, कंत्राटदारांच्या मदतीने युद्धस्तरावर कामाला सुरुवात केली. सर्वत्र चिखल, पाणी असल्याने वीज खांब, वीज वाहिन्या वाहून नेणे आणि अशा दलदलीत वीज यंत्रणेची उभारणी करणे अशक्यप्राय कामे करण्यात आली. परिणामी, निंबी, म्हैसपूर, रिधोरा, सुकोडा, पाचमोरी, न्यू सुकोडा, जुना सुकोडा, अमानतपूर, ताकोडा, जलम, टाकळी, वाकापूर, गडंकी या गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे.
ही गावे अंधारातच
लोणी, भोड, सांगवी, मोहाडी, कानडी, वाखी, आखतवाडा, आगर, लोणाग्रा, दुधाळा, मांडला, कांचनपूर, बदलापूर, नवथळ आणि खेकडी या गावांचा वीजपुरवठा खंडित आहे. वीजपुरवठा बंद असलेली सर्व गावे ही उगवा वाहिनीवर असून या वाहिनीचे वीज खांब मोर्णा नदीच्या पुरात वाहून गेले आहेत. शिवाय मोर्णा व पुर्णा नदीच्या पूरस्थितीमुळे या गावांना जोडणारे रस्ते बंद असल्याने संपर्क होणे कठीण झाले आहे. पूरस्थिती ओसरताच या गावांचाही वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.
विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट यांच्या मार्गदर्शनात आणि उपकार्यकारी अभियंता सारंगधर केनेकर यांच्या नेतृत्वात तसेच अभियंते अजय भोकरे, हेमलता पाटील, तायडे, दीपक देशमुख, प्रवीण बदुकाले, सचिन कळुसे यांच्यासह जनमित्र श्रीशिव निंबेकर, प्रशांत शेळके, जितू गवई, शुभम मोहोड, आमटे, भागवत, अभय भारसाकळे, संजय कागणे, सोळंके, वाघोलीकर, तायडे, विजय केने आदी कार्यरत आहेत.