अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस; वीज कोसळून दोघांचा मृत्यू
By रवी दामोदर | Published: June 11, 2024 10:04 PM2024-06-11T22:04:31+5:302024-06-11T22:04:45+5:30
जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस
रवी दामोदर, अकोला: जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात टिपटाळा येथे अंगावर वीज कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दि.११ जून रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी तलाठ्यांनी अहवाल सादर केला आहे. तसेच खापरखेडा शिवारातही एका युवकाचा वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मूर्तिजापूर तालुक्यातील टीपटाळा येथील शालिग्राम श्रीराम डोंगरे (६५)हे त्यांच्या शेतात झाडाखाली थांबले असताना वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ब्रह्मी खुर्द येथील तलाठी यांनी अहवाल दिला आहे. दुसऱ्या घटनेत मौजे खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे (२६) या युवकाचा सोपान टापरे यांच्या शेतात मृतदेह आढळून आला असून, त्यांचा विजेमुळे मृत्यू झाला अशी माहिती आहे.
जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस
भारतीय हवामान विभागाच्या नागपूर येथील केंद्रातर्फे अकोला जिल्ह्यात दि. ११ ते १६ जूनदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यादरम्यान वा-याचा वेग ताशी ४० ते ५० किमी असेल, असा अंदाज आहे. नागरिकांनी वादळाच्या स्थितीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. झाडाखाली थांबू नये. वीज चमकत असताना मोबाईल, वीजेची उपकरणे बंद ठेवावी. वाहने वीजेचा खांब व झाडे यापासून दूर ठेवावीत, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने केली आहे.