पोळ्याला बरसला जिल्हयात दमदार पाऊस, पिकांना संजिवनी; शेतकरी समाधानी
By संतोष येलकर | Published: September 14, 2023 05:56 PM2023-09-14T17:56:35+5:302023-09-14T17:56:50+5:30
१३ सप्टेंबर रोजी जिल्हयातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती.
अकोला: बैलाचा सण पोळ्याच्या पर्वावर गुरुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत अकोला शहरासह जिल्हयात दमदार पाऊस बरसला. पावसाअभावी धोक्यात आलेल्या पिकांना या पावसाने संजिवनी मिळाली असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण परसले आहे. शेतकऱ्यांचा मित्र बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे पोळा. पोळा सण साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु असतानाच गुरुवार १४ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते ४ वाजताच्या दरम्यान अकोला शहरासह जिल्हयात सार्वत्रिक जोरदार पाऊस बरसला.
१३ सप्टेंबर रोजी जिल्हयातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी १ ते २ आणि त्यानंतर २.३० ते ४ वाजेपर्यंत अकोला शहर आणि जिल्हयात सर्वदूर दमदार पाऊस बरसला. गेल्या महिनाभरात पावसाने दांडी मारल्याने पिके धोक्यात आली होती. त्यामुळे जिल्हयात सर्वत्र दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात असतानाच, पोळ्याला पावसाने दमदार हजेरी लावल्याने, पिकांना संजिवनी मिळाली. बरसलेला पाऊस सोयाबीनसह सर्वच पिकांसाठी उपयुक्त असल्याने, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
नागरिकांना करावा लागला छत्री, रेनकोटचा वापर !
पोळा सण साजरा करण्याची धामधूम सुरु असतानाच गुरुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे नागरिकांना दिवसभर छत्री, रेनकोटचा वापर करावा लागल्याचे चित्र अकोला शहरातील विविध भागात दिसत होते. तसेच ढगाळ वातावरणासह बरसलेल्या पावसाने वातावरणात गारवा पसरल्याचे जाणवत होते.
सखल भागात साचले पावसाचे पाणी !
गुरुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत अकोला शहरासह जिल्हयातील विविध भागात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे अकोला शहरातील विविध भागात रस्त्यांच्या कडेला आणि सखल भागात पावसाचे पाणी साचल्याचे चित्र आहे.