अकोला शहरातील दहा मार्गांवर जड वाहतुकीस प्रतिबंध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 02:02 PM2019-08-14T14:02:04+5:302019-08-14T14:02:40+5:30
शहरातील प्रमुख दहा मार्गांवर जड वाहतूक तीन महिन्यांसाठी बंद केली आहे.
अकोला: शहरातील मध्यभागी असलेली बाजारपेठ आणि खरेदीसाठी होणारी गर्दीची वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यातही जड वाहतूक शहरातील प्रमुख मार्गांवरून जात असल्यामुळे नागरिकांना त्रास होतो. वाहतुकीचे नियंत्रण करता यावे आणि जड वाहतुकीला प्रतिबंध घालावा, या दृष्टिकोनातून शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सदानंद मानकर यांनी मंगळवारी शहरातील प्रमुख दहा मार्गांवर जड वाहतूक तीन महिन्यांसाठी बंद केली आहे.
अकोला शहरात गांधी रोड, टिळक रोडवर कापड बाजार, किराणा बाजार, कोठडी बाजार असल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होते. या रस्त्यांवर जड वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. या मार्गांवर शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह, बँक, धार्मिक स्थळे आणि प्रतिष्ठाने असल्यामुळे मोठी वर्दळ असते. त्यात जड वाहतूकही होत असल्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. अपघातसुद्धा घडतात. त्यामुळे या मार्गावरील जड वाहतुकीला पायबंद घालणे आवश्यक आहे. त्यासाठी या मार्गांवरील रहदारी सुरळीत होऊ शकेल, तसेच इतर बाजारपेठेच्या परिसरात सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत ग्राहकांची व व्यापारी वर्गाच्या मालवाहू वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. त्यामुळे बाजारपेठेच्या परिसरात सामान्य नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी व खरेदी-विक्रीसाठी जाणे-येणेसुद्धा अवघड होते. या सर्व कारणास्तव ४ आॅगस्ट ते ३ नोव्हेंबर या कालावधीत शहरातील दहा मार्गांवर जड वाहनांना प्रतिबंध घालण्यात आला आहे.
या मार्गांवर जड वाहतूक बंद
शालिनी टॉकीज ते अकोट स्टॅन्ड, दगडी पूल ते माळीपुरा चौक, अकोट स्टॅन्डकडून सिटी कोतवाली चौकाकडे येणारा मार्ग, अकोट स्टॅन्ड ते अग्रेसन चौकाकडे येणारा मार्ग, अग्रेसन चौक ते बाजारपेठेत जाणारा मार्ग, टॉवर चौक ते फतेह अली चौकाकडे जाणारा मार्ग, रेल्वे स्टेशन मालधक्का ते रामदासपेठ पोलीस ठाण्याकडून दामले चौक ते फतेह अली चौकाकडे जाणारा मार्ग, बाळापूर नाकाकडून शहरात येणारा मार्ग, वाशिम बायपासकडून शहरात येणारा मार्ग, डाबकी रोड रेल्वे फाटकाकडून शहरात येणाऱ्या मार्गावर पुढील तीन महिने जड वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे.