लाखपुरी येथे भीषण पाणीटंचाई; ग्रामस्थांची भटकंती
By Admin | Published: June 18, 2017 02:01 AM2017-06-18T02:01:43+5:302017-06-18T02:01:43+5:30
दहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प : ग्रामस्थांचा मोर्चा काढण्याचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखपुरी : गावात गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे ग्रामस्थांची पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती होत आहे.
लाखपुरी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने पाणीपुरवठा करण्यात येतो. योजनेचा पाणीपुरवठा गेल्या १0 दिवसांपासून बंद असल्यामुळे गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पूर्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी वापरावे लागत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पूर्णा नदीत अमरावती जिल्ह्यातील दूषित पाणी येते. गावात पाण्याचा दुसरा स्रोत उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना दूषित पाणी प्राशन करावे लागत आहे. गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने ३ ते ४ दिवसांनंतर पाणी पुरवठा केला जातो. १0 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी, वापरासाठी पाणीसुद्धा मिळत नाही. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या फाट्यावर हातपंप आहे. ग्रामस्थांना तेथून पाणी आणावे लागत आहे. याकडे लोकप्रतिनीधींचेही दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे.
सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकर्यांसह मजुरांना आपली मजुरी सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा करणार्या पाइपलाइनवर अनेक ठिकाणी लिकेज आहेत. या लिकेजमधून गावातील सांडपाणी पाइपलाइनमध्ये जात असून, त्याचाच पुरवठा ग्रामस्थांना होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.