सहायक बीडीओंच्या अधिकारावर टाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2017 12:57 AM2017-04-07T00:57:36+5:302017-04-07T00:57:36+5:30
अकोला- सहायक गटविकास अधिकाऱ्यांच्या अधिकारावर टाच आणून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे, असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे
अकोला : पंचायत समित्यांमध्ये शासनाने सहायक गटविकास अधिकाऱ्यांना पदस्थापना दिली. त्यांना कामाचे वाटपही केले. मात्र, काही पंचायत समित्यांमध्ये संबंधित कामाच्या फायली त्यांच्याकडे न जाता परस्पर गटविकास अधिकारीच निपटारा करतात. त्यामुळे सहायक गटविकास अधिकाऱ्यांच्या अधिकारावर टाच आणून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे, असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. सहायक गटविकास अधिकाऱ्यांना पदस्थापना देतानाच त्यांच्याकडे असलेल्या कामाबाबतचे आदेशही शासनाने दिले. ३० आॅक्टोबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार त्यांच्याकडे कृषी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण तसेच पशुसंवर्धन या चार विभागांचा स्वतंत्र कार्यभार आर्थिक व प्रशासकीय बाबींसह देण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून रूजू झाल्यानंतर दलित वस्ती विकास निधी कामाच्या फायली सहायक गटविकास अधिकाऱ्यांकडे न येता परस्पर गटविकास अधिकाऱ्यांकडेच सादर केल्या जातात. त्यातून सहायक गटविकास अधिकाऱ्यांचे अधिकार डावलण्यात येत आहेत. हा प्रकार अकोट, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी पंचायत समित्यांमध्ये सुरू आहे. गटविकास अधिकाऱ्यांना सातत्याने या प्रकाराची जाणीव करून दिल्यानंतरही काहीच फरक पडलेला नाही. त्यामुळे आता अधिकारासाठी भांडण्याची वेळ सहायक गटविकास अधिकाऱ्यांवर आली आहे.
टक्केवारीचा मोह सुटेना!
दलित वस्ती विकास निधीतून कोट्यवधींची कामे प्रत्येक पंचायत समितीमध्ये होतात. त्या कामांची देयकं अदा करताना ठरल्याप्रमाणे टक्केवारीचे वाटप होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना या टक्केवारीचा मोह सुटता सुटत नसल्यानेच इतरांना डावलून स्वत:कडेच काम ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे.