‘हॅॅलाे मी सैन्यातून अधिकारी बाेलताेय’; सायबर फसवूणकीचा फंडा
By आशीष गावंडे | Published: January 24, 2024 06:05 PM2024-01-24T18:05:59+5:302024-01-24T18:06:14+5:30
सायबर फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार उजेडात येत आहेत. अशी फसवणूक करणारी व्यक्ती किंवा हॅकर परराज्यात बसून नागरिकांच्या खात्यातून लाखो रुपयांची रक्कम लंपास करीत आहेत.
अकोला: अनोळखी मोबाईल नंबर वरून संपर्क करून आर्थिक फसवणूक व लुबाडणूक करण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत चालली असताना अनेक उच्चभ्रू पुरुष व महिला अनोळखी व्यक्तींच्या भूलथापांना बळीत पडत असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी शहरातील व्यावसायिकांनी ‘एसपी’कार्यालयाकडे तक्रार केली. दरम्यान, अशा सायबर फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले आहे.
सायबर फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार उजेडात येत आहेत. अशी फसवणूक करणारी व्यक्ती किंवा हॅकर परराज्यात बसून नागरिकांच्या खात्यातून लाखो रुपयांची रक्कम लंपास करीत आहेत. पोलिसांकडे प्राप्त तक्रारीनुसार अकोला केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनमधील काही सदस्यांना अनाेळखी माेबाइल क्रमांकावरुन एका व्यक्तीने ताे सैन्यातील अधिकारी असल्याचे भासवून फोन कॉल व व्हाट्सअपच्या माध्यमातून औषध व जनरल वस्तूची मागणी केली. नंतर दबाव टाकून दिलेल्या ऑर्डरचा माल पाठवा पेमेंट करतो असे सांगून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून फसवणूक केली. यासंदर्भात ज्या मोबाईल नंबरवरून कॉल आले होते त्या सर्व कॉलची माहिती पोलिसांनी काढली असता, ते सर्व मोबाईल नंबर बनावटी असून त्यांचे लोकेशन राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेशातील जंगलातील असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
फसवणुकीचे अनेक फंडे
सैन्य दलातील अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक व आर्थिक लुबाडणूक केली जात आहे. सैन्य दलातून बदली झाल्यामुळे घरातील जुने साहित्य, कार, मोटर सायकलची विक्री करावी लागत असल्याचे सांगून बँक डिटेल्स घेतल्या जात आहेत. तसेच ओळखीच्या लोकांचे सोशल मीडिया अकाउंट तयार करून पैशांची मागणी केली जात आहे. आम्हाला शेतात खोदकाम करत असताना गुप्तधन मिळाले आहे. ते तुम्हाला अर्ध्या किमतीत देतो, असे निरनिराळे फंडे वापरून नागरिकांची फसवणूक केली जात आहे.
अनाेळखी माेबाइल क्रमांकावरुन किंवा व्हाट्सअप द्वारे माहिती मागितल्यास नागरिकांनी आपले बँक डिटेल्स, यूपीआय डिटेल्स अथवा ओटीपी क्रमांक देऊ नये. खात्यातून पैसे लंपास झाल्यास तातडीने बॅंक व सायबर विभागात संपर्क साधावा.
-बच्चन सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक,अकाेला