हॅलो... लसीकरण केंद्रातून बोलतेय... तुम्ही सेकंड डोस घेतलाय का?

By Atul.jaiswal | Published: September 14, 2021 10:56 AM2021-09-14T10:56:28+5:302021-09-14T10:56:59+5:30

Have you taken the second dose? : कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी अनेकजण टाळाटाळ करत असल्याने, आरोग्य विभाग अशा लोकांना फोन करून लसीचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करत आहे.

Hello ... Speaking from the vaccination center ... Have you taken the second dose? | हॅलो... लसीकरण केंद्रातून बोलतेय... तुम्ही सेकंड डोस घेतलाय का?

हॅलो... लसीकरण केंद्रातून बोलतेय... तुम्ही सेकंड डोस घेतलाय का?

googlenewsNext

- अतुल जयस्वाल

अकोला : ‘हॅलो... अमूक-अमूक बोलताय का?... मी लसीकरण केंद्रातून बोलतेय... तुम्ही कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे का?... नसेल तर लवकरच जवळच्या केंद्रावर या आणि दुसरा डोस लावून घ्या’, अशी विचारणा करणारे फोन दुसरा डोस न घेतलेल्या अकोलेकरांना येत आहेत. कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी अनेकजण टाळाटाळ करत असल्याने, आरोग्य विभाग अशा लोकांना फोन करून लसीचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करत आहे.

 

कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, शासनाकडून लसीकरण मोहिमेला गती देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सरसावली आहे. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. जिल्ह्यातील १४,२४,२६८ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट असून, १२ सप्टेंबरपर्यंत ५,४३,२१७ नागरिकांचा पहिला डोस घेऊन झाला आहे, तर २,२३,६३५ नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांची एकूण संख्या ७,६६,८५२ एवढी आहे. एकूण उद्दिष्टाच्या केवळ १५.७० टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

 

लसीचे दोन्ही डोस घेतले तरच कोरोना संसर्ग टाळला जाऊ शकतो. त्यामुळे आरोग्य विभागाकडून नागरिकांना दुसरा डोस घेण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.

 

शहरातील लसीकरण केंद्र

  • नागरी आरोग्य केंद्र, खदान १६ क्रमांक शाळा
  • नागरी आरोग्य केंद्र, सिंधी कॅम्प खडकी
  • नागरी आरोग्य केंद्र, नायगाव एपीएमसी मार्केट
  • आर. के. टी. आयुर्वेदिक महाविद्यालय
  • कस्तुरबा रुग्णालय, डाबकी रोड
  • नागरी आरोग्य केंद्र, अशोक नगर
  • नागरी आरोग्य केंद्र, विठ्ठल नगर, मोठी उमरी
  • नागरी आरोग्य केंद्र, हरिहर पेठ
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
  • आयएमए हॉल, सिव्हील लाईन चौक
  • भरतीया रुग्णालय, टिळक रोड
  • जिल्हा स्त्री रुग्णालय
  • नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर, मनपा शाळा क्रमांक २२

 

३५ हजार नागरिक दुसऱ्या डोसच्या उंबरठ्यावर

पहिला डोस पूर्ण केलेल्यांपैकी जवळपास ३५ हजार नागरिकांची दुसरा डोस घेण्याची तारीख उलटून गेली आहे. त्यामुळे या ३५ हजार नागरिकांना लवकर दुसरा डोस देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सरसावली आहे. यामध्ये कोव्हॅक्सिन डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

 

जिल्ह्यात लसीकरणाची स्थिती

 

उद्दिष्ट             १४,२४,२६८

 

पहिला डोस ५,४३,२१७

 

दुसरा डोस २,२३,६३५

 

लस घेतलेले एकूण ७,६६,८५२

 

जिल्ह्यात दिल्या जाणाऱ्या लसी

कोव्हॅक्सिन

कोविशिल्ड

 

कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. तिसरी लाट टाळायची असेल तर नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचे डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. दुसऱ्या डोसची मुदत संपलेल्या नागरिकांनी तातडीने दुसरा डोस टाेचून घ्यावा.

 

- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला

Web Title: Hello ... Speaking from the vaccination center ... Have you taken the second dose?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.