धान्य वाटप केल्यानंतरही कमिशनसाठी हेलपाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:55 AM2021-01-08T04:55:50+5:302021-01-08T04:55:50+5:30
अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत रेशन दुकानदारांमार्फत धान्य ...
अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत रेशन दुकानदारांमार्फत धान्य वाटप करण्यात आले त्यासाठी दुकानदारांना कमीशन देण्याची घाेषणा करण्यात आली हाेती, मात्र ते अद्यापही न मिळाल्याने स्वस्त धान्य दुकानदार कमीशनसाठी हेलपाटे मारत आहेत.
सदर धान्याचे वाटप केल्यानंतर सुद्धा दुकानदारांना कमिशनची प्रतीक्षा करावी लागत आहे. कमिशन मिळत नसल्याने रेशन दुकानदारांमध्ये नाराजी आहे, अशी माहिती स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थी व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्य प्रति महिना पाच किलो तांदूळ मोफत देण्यात आले. धान्यासाठी रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल १५० रुपयांचे कमिशन देण्याचे शासनाने जाहीर केले होते. सदर योजनेला शासनाने नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. तरेशन दुकानदारांना प्रति क्विंटल मागे १५० रुपये कमिशन जाहीर केले होते. त्याचे दुकानदारांनी धान्य वितरण केल्यानंतर सुद्धा त्यांना कमिशनसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ प्रति व्यक्तीमागे देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्याअंतर्गत लाभार्थ्यांना जुलै महिन्याचे धान्य सवलतीच्या दरात देण्यात आले. परंतु ऑगस्ट महिन्याचे धान्य देण्यास शासनाने हात अखडता घेतला होता. सदर धान्य अद्याप रेशन कार्डधारकांना मिळाले नाही. त्यामुळे संबंधित कार्डधारक रेशन दुकानांमध्ये जाऊन दुकानदारांसोबत वाद घालत असल्याचे प्रकार सुद्धा होत आहेत.
काेट
पाच महिन्यांचे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे कमिशन स्वस्त धान्य दुकानदारांना कधी मिळणार हा प्रश्नच आहे. पुरवठा विभागाकडे आम्ही सातत्याने मागणी करत आहाेत.
योगेश अग्रवाल
महानगराध्यक्ष
स्वस्त धान्य दुकानदार संघटना