बागायतदारांना ‘कोरडवाहू’ची मदत!
By Admin | Published: January 22, 2015 02:05 AM2015-01-22T02:05:39+5:302015-01-22T02:05:39+5:30
बागायतीच्या मदतीतून कापूस उत्पादक बागायतदार शेतकरी बाद.
संतोष येलकर / अकोला: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये कोरडवाहू, बागायती व फळबाग शेतीसाठी मदत दिली जात आहे; मात्र बागायतदार शेतकर्यांना दिल्या जाणार्या मदतीत खरीपपूर्वी कपाशीची लागवड करणार्या बागायतदार कापूस उत्पादक शेतकर्यांना कोरडवाहू शेतीची मदत दिली जात आहे. त्यामुळे बागायतदार शेतकर्यांना दिल्या जाणार्या सरकारी मदतीतून कापूस उत्पादक बागायतदार शेतकर्यांना बाद करण्यात येत असल्याची बाब समोर येत आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यात खरीप हंगामातील पिके शेतकर्यांच्या हातून गेली. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारकडून सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी मदतही जाहीर करण्यात आली. त्यानुसार मदत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात शासनाकडून जिल्हानिहाय मदत निधीचे वितरण करण्यात आले असून, मदतीची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. या मदतीमध्ये अल्प व अत्यल्पभूधारक शेतकर्यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंंत आणि बहुभूधारक शेतकर्यांना एक हेक्टर र्मयादेपर्यंंत मदतीचे वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये जिरायती (कोरडवाहू) शेतीसाठी प्रतिहेक्टर ४ हजार ५00 रुपये, बागायती शेतीसाठी प्रतिहेक्टर ९ हजार रुपये आणि फळबागांसाठी प्रतिहेक्टर १२ हजार रुपये मदत दिली जात आहे. बागायतदार शेतकर्यांना प्रतिहेक्टर ९ हजार रुपयांप्रमाणे मदतीचे वाटप करण्यात येत असले तरी, मे महिन्यात मान्सूनपूर्व कपाशी, सोयाबीन व तूर इत्यादी पिकांची लागवड करणार्या बागायतदार शेतकर्यांना कोरडवाहू शेतीसाठी दिली जाणारी मदत वाटप केली जात आहे. बागायती शेतीप्रमाणेच मान्सूनपूर्व कपाशी तसेच सोयाबीन व तूर इत्यादी पिकांना विहिरी, बोअर व शेततळ्यातून पाणी देऊन पिकांना जगविले जाते. त्यानुसार सरकारकडून बागायतदार शेतकर्यांना दिल्या जाणार्या मदतीप्रमाणेच कापूस, सोयाबीन व तूर इत्यादी बागायती पिकांसाठीही बागायतदार शेतकर्यांना हेक्टरी ९ हजार रुपये मदत मिळणे अपेक्षित असताना, या बागायतदार शेतकर्यांना मात्र कोरडवाहू शेतीसाठी दिली जाणारी हेक्टरी ४ हजार ५00 रुपयांप्रमाणे मदत दिली जात आहे. त्यामुळे बागायत पिकांसाठी देण्यात येणार्या मदतीतून कापूस उत्पादक बागायतदार शेतकर्यांना बाद करण्यात आल्याची बाब समोर येत आहे.
*बागायती पिकांचे निकष कोणते?
बागायती पिकांप्रमाणेच मान्सूनपूर्व कपाशी, सोयाबीन व तूर इत्यादी पिकांची लागवड केली जाते. विहीर, बोअर, शेततळी व कॅनॉलमधील पाण्याचा वापर करून ही पिके घेतली जातात. इतर बागायती पिकांप्रमाणेच ही पिके घेतली जात असताना, बागायती शेतीसाठी दिली जाणारी मदत मात्र या पिकांसाठी दिली जात नाही. त्यामुळे बागायती पिकांचे निकष कोणते, असा प्रश्न दुष्काळग्रस्त कापूस उत्पादक बागायतदार शेतकर्यांकडून उपस्थित केला जात आहे.