आई-पत्नीच्या मदतीनेच सचिनची हत्या
By admin | Published: March 18, 2015 01:35 AM2015-03-18T01:35:04+5:302015-03-18T01:35:04+5:30
अकोला तालुक्यातील घटना; अनैतिक संबंधासाठी आई-पत्नीच्या नात्याला फासली काळिमा.
अकोला: शिवणीमध्ये रविवारी मध्यरात्री घडलेल्या सचिन भटकर हत्याप्रकरणाचा गुंता सोडविण्यात पोलिसांना मंगळवारी यश आले. अनैतिक संबंधांमध्ये अडसर होत असल्यानेच त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले. सचिनची हत्या करणार्या विजय नरवाडे याच्यासह त्याला मदत करणारी सचिनची आई व पत्नी या तिघांनाही जेरबंद करण्यात आले आहे. अनैतिक संबंधांसाठी वासनांध झालेल्या आई आणि पत्नीच्या महान नात्याला या घटनेमूळे काळीमा फासल्या गेली असून या तीनही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शिवणीमधील राहुलनगर येथील रहिवासी सचिन नाजुकराव भटकर (२७) याचा मृतदेह याच परिसरातील खदान भागात सोमवारी पहाटे आढळल्यानंतर पोलिसांनी या हत्याप्रकरणातील मारेकर्यांचा शोध सुरू केला. सोमवारी रात्री उशिरा या प्रकरणात चिखलपुरा येथील रहिवासी विजय नरवाडे मृतक सचिन भटकर याची आई चंदा भटकर आणि पत्नी सरिता भटकरसह आणखी सात जनांना ताब्यात घेउन त्यांची कसून चौकशी सुरु केली. यामधील विजय नरवाडे आणि सचिनची आई चंदा व पत्नी सरिता यांनी सिव्हील लाईन्स पोलिसांसमोर सचिनची हत्या केल्याची कबूली दिली. सचिन भटकरला या प्रकरणातील तीनही आरोपींचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली होती. त्यामूळे त्याने या अनैतिक संबधाला विरोध केला. सचिन भटकर अडसर ठरत असल्याने त्याची आई आणि पत्नी यांनी सचिनचा अडसर कायमस्वरूपी दूर केला. रविवारी मध्यरात्री त्याची राहत्या घरातच हत्या करून मृतदेह एका दुचाकीवर घेऊन खदानमध्ये टाकण्याचा बेत आखला, मात्र मृतदेह घेऊन जात असताना अडथळा आल्याने या तिघांनी त्याचा मृतदेह शिवणीतील खदान परिसरात फेकला. सोमवारी पहाटे चंदा आणि सरीता यांनी मुलाची हत्या झाल्याचे नाटक करीत आकांड-तांडव केला.