ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मदत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:17 AM2021-01-18T04:17:09+5:302021-01-18T04:17:09+5:30
अकोला : पाऊस व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी दहा दिवसांपूर्वी २५ कोटी ...
अकोला : पाऊस व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी दहा दिवसांपूर्वी २५ कोटी ७८ लाख ७२ हजार रुपये मदतीची जिल्ह्यातील तहसील कार्यालस्तरावर वितरित करण्यात आली असून, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, पीक नुकसानाची मदत केव्हा मिळणार, याबाबत जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ३४ हजार ४५४ शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सतत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. त्यानुषंगाने पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यांतील ७२ हजार ४७५ शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ५१ कोटी ५७ लाख ४६ हजार रुपयांच्या मदतनिधीची मागणी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासनामार्फत २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला होता. उपलब्ध मदतीची रक्कम डिसेंबरअखेरपर्यंत ३८ हजार ४५४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शासनामार्फत प्राप्त झालेली २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपयांची मदतीची रक्कम गत ८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयस्तरावर वितरित करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील महसूल यंत्रणा व्यस्त असल्याने, दहा दिवसांपूर्वी वितरित करण्यात आलेली मदतीची रक्कम जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ३४ हजार ४५४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया रखडली आहे. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी १८ जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक नुकसानाची मदत जमा करण्याची प्रक्रिया ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर जिल्ह्यातील तहसील कार्यालयांकडून सुरू करण्यात येणार आहे. पीक नुकसानाची मदत खात्यात केव्हा जमा होणार, याबाबत जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानाची मदत वाटप करण्यासाठी २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपयांची रक्कम जिल्ह्यातील तहसील कार्यालयस्तरावर वितरित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे.
-संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी